बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘कांदा ओता’ आंदोलन
सिन्नर : प्रतिनिधी
कांद्याला प्रतिक्विंटल किमान तीन हजार रुपये दर मिळावा, तसेच शेतमालाला हमीभाव लागू करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 22) सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून बाजार समितीत कांदा ओतत शासनाविरोधात घोषणाबाजी केली.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कांदा लिलाव सुरू असतानाच आंदोलनकर्ते बाजार समितीत दाखल झाले. कांद्याला तीन हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे, शेतमालाला हमीभाव द्या, शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी शरद शिंदे यांनी स्थानिक आमदार आणि खासदारांवर टीका करत कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. बाजार समितीत उपस्थित असलेल्या शेतकर्यांनीही आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा दर्शविला.
आंदोलनानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे, संचालक सुनील चकोर आणि नवनाथ नेहे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात शिवाजी गुंजाळ, कन्हैया लोणारे, भगवान आव्हाड, कुंडलिक बलक, चिंधू गुंजाळ, एस. पी. शिंदे, पुंजाराम हारक, रतन तुपे, लक्ष्मण तुपे आदी सहभागी झाले होते.
Farmers are aggressive as there is no price for onions.