आहारातील घटकांवर आरोग्य अवलंबून असते. रोजचा आहार चौरस असावा म्हणजे त्यात शरीराला आवश्यक असणार्या सर्व पदार्थांचा समावेश असावा, असे आहारशास्त्र सांगते. पण धावपळीच्या सध्याच्या काळात लोकांना स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी वेळ नाही, मग आधार घेतला जातो तो फास्टफूडचा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण फास्टफूड आवडीने खातात. विशेषतः शाळकरी मुलांना तर फास्टफूड म्हणजे पर्वणीच वाटते. घरी तयार केलेली भाजी-पोळी खाताना किरकिर करणारी मुले फास्टफूड मात्र मिटक्या मारत खातात. त्यामुळेच झटपट तयार होणारे आणि जिभेला हवेहवेसे वाटणारे हे पदार्थ सध्या भरपूर खपतात. जिभेला हवेहवेसे वाटणारे हे पदार्थ प्रकृतीला मात्र चांगले नसतात. झटपट तयार होणार्या या फास्टफूडमध्ये साखर आणि मीठ यांचे प्रमाण खूप असते. शिवाय ते भरपूर तळलेलेदेखील असतात. अति प्रक्रिया केलेल्या या पदार्थांत कोणतेही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे या पदार्थांपासून दूर राहावे, असा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ देत असतात, तरी लोक त्यांचे ऐकत नाही. दोन वर्षांपूर्वी एका फास्टफूड बनवणार्या जगप्रसिद्ध कंपनीने हे मान्य केले होते की, ही कंपनी तयार करीत असलेल्या 60 टक्के पदार्थात आणि शीतपेयांमध्ये शरीराला पौष्टिक असे काही नाही. या कंपनीचे नुडल्स आणि कॉफी हे दोन पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. शिवाय चॉकलेट, केक, पास्ता, केचप, वेफर्स, कुरकुरे यांसारखे विविध पदार्थ ही कंपनी बनवते. फास्टफूडमुळे मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. अतिप्रमाणात फास्टफूड खाण्यात आल्यास हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलतेचा धोका आहे. अतिप्रमाणात फास्टफूड खाणार्यांना कर्करोगासारखा असाध्य आजारही होऊ शकतो, असे जाणकार सांगतात.
Fast food is dangerous