तब्बल उच्चांकी 42 अंशांची नोंद : जनजीवन विस्कळीत
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरात गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून, तापमानात सातत्याने वाढ होत आहे. 7 ते 13 एप्रिल या कालावधीत कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. सोमवारी (दि. 13) तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.
आठवड्याच्या सुरुवातीला 7 एप्रिल रोजी कमाल तापमान 36.6 अंश इतके होते. त्यानंतर 8 एप्रिलला 35.6 अंश आणि 9 एप्रिलला 35.4 अंश अशी किंचित घट झाली. मात्र, 10 एप्रिलपासून तापमानाने पुन्हा झपाट्याने वाढ घेतली. 10 एप्रिलला 37.6 अंश, 11 एप्रिलला 41 अंश, 12 एप्रिलला 41.4 अंश आणि 13 एप्रिलला 42 अंश तापमान नोंदवले गेले. किमान तापमानातही काही प्रमाणात चढ-उतार दिसून आला असून, ते 17.6 अंश ते 21.2 अंशांदरम्यान राहिले. विशेष म्हणजे, संपूर्ण आठवडाभरात एकदाही पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे वातावरणातील उष्णतेची तीव्रता अधिक वाढली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मालेगाव शहर उष्णतेचे ‘हॉटस्पॉट’ ठरत असून, एप्रिल महिन्यातच तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. यंदा मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काही काळ तापमानात घट झाली होती. मात्र, त्याचा परिणाम कमी होताच पुन्हा तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. मागील पाच दिवसांत तापमानात तब्बल सहा अंशांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते ओस पडत आहेत. मोसमपूल, कॅम्प रस्ता, सटाणा नाका, जुना आग्रा रोड, कुसुंबा रस्ता या नेहमी गजबजलेल्या भागांमध्येही दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत असून, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडत आहेत.
शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांनाही या उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. भरउन्हात परीक्षा केंद्रावर ये-जा करताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विवाहसोहळ्यांच्या हंगामातही उकाड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Malegaon has been experiencing heatwave for a week now