विंचूरच्या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

विंचूरच्या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

विंचूर :: प्रतिनिधी

येथील मारवाडी पेठ परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. स्थानिक व्यापारी विजयकुमार (पवन) नंदकुमार जाजू यांच्यावर मनोज गोराडे (रा. विंचूर) याने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी गोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पवन जाजू हे आपल्या घरासमोर असताना संशयित आरोपी गोराडे तेथे आला. दोघांमध्ये काही वेळ वादावादी झाली आणि अचानक मनोज गोराडे याने चाकूने वार करून हल्ला केला. जखमी जाजू खाली कोसळले, तर आरोपी स्कुटीवरून घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जाजू यांना लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र हल्ल्यात आतड्याला गंभीर दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.प्राथमिक माहितीनुसार, विजयकुमार (पवन) जाजू आणि मनोज गोराडे हे दोघेही टोमॅटो कॅरेट व्यवसायातील भागीदार होते. काही आर्थिक व्यवहारांवरून वाद सुरू असल्याचे समजते. याच वादातून हा हल्ला घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, लासलगाव पोलिसांनी आरोपी मनोज गोराडे याला ताब्यात घेतले असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *