लाखोंचे नुकसान; जीवितहानी टळली
सिन्नर ः प्रतिनिधी
मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीमधील विनस पॅकेजिंग कंपनीतील कच्चा माल साठवणुकीच्या ठिकाणी काल (दि.2) मध्यरात्री 1.30 ते 2.00 वाजेच्या सुमारास विद्युतवाहक तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत पाच ते सात लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
कंपनीत मोठ्या प्रमाणात कोरोगेशन पेपरचा साठा असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्ररूप धारण केले. कामगार-कर्मचार्यांनी कंपनीतील उपलब्ध असलेल्या फायर सिस्टिमचा वापर करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
कंपनीचे डायरेक्टर अनिल आसावा यांनी तत्काळ सिन्नर नगरपालिका, माळेगाव एमआयडीसी, नाशिक महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन सव्वा ते दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीत पाच ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
fire-breaks-out-at-packaging-company-in-musalgaon