चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
सिन्नर : प्रतिनिधी
वडझिरे घाटात सोमवारी (दि. 8) सकाळी धावत्या टीयूव्ही कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. माळेगाव एमआयडीसी येथील आपल्या किराणा दुकानाकडे जात असताना ही घटना घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून वेळेत वाहनाबाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
माहितीनुसार, वडझिरे येथील किसन एकनाथ बोडके हे एमएच 04 जेव्ही 9223 क्रमांकाच्या टीयूव्ही कारमधून माळेगाव एमआयडीसीकडे निघाले होते. वडझिरे घाटात वाहनातून अचानक धूर निघू लागल्याने त्यांनी तातडीने कार रस्त्याच्या कडेला थांबवली. काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला आणि आगीने संपूर्ण कारला वेढा घातला.
घटनेची माहिती मिळताच मनसे शाखाध्यक्ष दिपक बोडके यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
Fire breaks out in TUV running at Vadzire Ghat; Vehicle gutted in a few minutes