भातशेती पाण्याखाली : शाळा, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, वाहतूक विस्कळित
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून अतिवृष्टीसदृश धुवांधार पाऊस बरसत असून, या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील दारणा नदीसह भाम, वाकी, मुकणे, भावली या नद्यांना पूर येऊन त्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. या नद्यांच्या पुराचे पाणी लगतच्या शेतांमध्ये पसरल्याने नदीपात्रांलगतची भातशेती पाण्याखाली गेली आहे.
नद्यांमधून होणारी पाण्याची वाढती आवक तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेता जलसंपदा विभागाने दारणा, भामसह सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविला आहे. गेल्या चोवीस तासांत दारणा धरणातून 400 क्यूसेकवरून टप्प्याटप्य्याने 10,284 पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला आहे.
तालुक्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसाने ग्रामीण भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवरील वाहतूक विस्कळित झाली आहे. घोटी, इगतपुरी येथील बाजारपेठ, शाळांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. शाळांना सुट्टी नसली तरी ग्रामीण भागातून, खेड्यातून, दूरवरून पायी, रिक्षा व सायकलने येणार्या विद्यार्थ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन घरी सुरक्षित थांबावे, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले होते.
दरम्यान, नदीपात्रालगतच्या तसेच ग्रामीण भागात शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीपात्रालगतची शेती पूर्णतः पाण्यात गेल्याने भात पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या सर्व नुकसान झालेल्या भातशेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग शिंदे, एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी प्रशासनाकडे केली आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 160 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत 3083 मिमी पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले. यावरून एकूण वार्षिक सरासरीच्या 90 टक्के पाऊस झाला असून, यंदा सरासरीच्या विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
‘दारणा’तून टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ
दारणा धरणातून मंगळवारी सकाळी 400 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, दिवसभरात पावसाचा वाढलेला जोर, नद्यांची वाढलेली पूरपातळी, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची होणारी वाढती आवक लक्षात घेता टप्प्याटप्प्याने ‘दारणा’तून दिवसभर विसर्गात मोठी वाढ करून बुधवारी सकाळी 11 वाजता जलसंपदा विभागाने 10,284 क्यूसेकपर्यत विसर्ग वाढवला. तसेच भाम धरणातूनही 5283 क्यूसेक विसर्ग पाणी दारणाकडे झेपावले आहे. भावलीतून 2152 क्यूसेक, वाकी धरणातून 1863 क्यूसेक, तर मुकणेतून 900 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…