अकरावीसाठी ३० पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

 

नाशिक : प्रतिनिधी महापालिका क्षेत्रात इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे . शैक्षणिक वर्ष २०२२ २३ च्या प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाने महत्त्वाची घोषणा केली आहे . त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी येत्या ३० मेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा भाग एक भरता येणार आहे . राज्यात नाशिक महापालिकेसह मुंबई महानगर क्षेत्र , पुणे , पिंपरी – चिंचवड , अमरावती , नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे . उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील , असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे . दरम्यान , केंद्रीय ऑनलाइन पद्धतीअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मेपासून सुरू होईल . अर्जाचा भाग एक भरताना विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती दाखल करता येईल . तर निकाल जाहीर झाल्यानंतर शाखा व महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम निवडीकरिता अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे . यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घोषित केला जाणार आहे . दरम्यान , प्रत्यक्षात अर्ज भरताना चूक होऊ नये म्हणून अर्ज भरण्याचा सराव करण्याची सुविधा ( मॉक डेमो रजिस्ट्रेशन ) शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे . सोमवार ( दि . २३ ) पासून २७ मे दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे . यानंतर २८ मेस ही माहिती नष्ट करण्यात येईल . प्रत्यक्षात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ही माहिती दाखल करणे आवश्यक राहणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *