माजी महापौर मुर्तडक फरार, पोलिसांकडून शोध

दमबाजीमुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडून होणार्‍या दमबाजीला कंटाळून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुर्तडक हे फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते योगेश बाळकृष्ण दाभाडे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मानसिक तणावातून दाभाडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, या प्रकरणातील संशयित माजी महापौर अशोक मुर्तडक फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध
घेत आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अशोक मुर्तडक यांच्याविरोधात घरात घुसून मारहाण करणे तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश दाभाडे (वय 48, रा. लामखेडे मळा, तारवालानगर, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सुमारे वर्षभरापूर्वी त्यांनी मुर्तडक यांच्याकडून 90 लाख रुपये उसने घेतले होते. त्यापैकी 45 लाख रुपये त्यांनी परत केले असून उर्वरित रकमेपेक्षा अधिक पैसे मागितल्याने वाद निर्माण झाला. दाभाडे यांनी अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना सतत त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. तसेच 12 मार्च रोजी रात्री उशिरा मुर्तडक यांनी दाभाडे व त्यांच्या कुटुंबीयांना कथितपणे जबरदस्तीने नेऊन मध्यरात्रीपर्यंत धमकावून ठेवले, असेही फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर 15 मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मुर्तडक यांनी दाभाडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसमोर मारहाण केली. घराची झडती घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने दाभाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Former mayor Murtadak absconding, police searching for him

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *