‘मनी लाँड्रिंग’ची भीती दाखवून 42 लाख 60 हजारांची फसवणूक

सिडको : प्रतिनिधी
मुंबई पोलिसांकडून बोलत असल्याचे भासवून ‘मनी लाँड्रिंग’च्या गुन्ह्यात अडकल्याची भीती दाखवत नाशिकमधील एका व्यक्तीची तब्बल 42 लाख 60 हजार 434 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉइस कॉल, व्हिडीओ कॉल आणि चॅटिंग करून संशयितांनी संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपासून 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत संबंधित व्यक्तीशी एका व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून संशयितांनी संपर्क साधला. आपण मुंबई पोलिसांतून बोलत असल्याचे भासवून संबंधित व्यक्ती मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून तपासाच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. पोलिस असल्याचे भासवून केलेल्या या संभाषणामुळे घाबरलेल्या व्यक्तीने संशयितांच्या सांगण्यावरून एकूण 42 लाख 60 हजार 434 रुपये विविध बँक खात्यांवर वर्ग केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक शहर सायबर पोलीस करीत आहेत. दरम्यान नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून पोलीस, तपास यंत्रणा किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी केल्यास कोणतीही रक्कम वर्ग करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Fraud of ₹42.60 lakh by instilling fear of ‘money laundering’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *