बाजार समितीमध्ये पावती पुस्तक घोटाळा

पंचवटी : वार्ताहर
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कर्मचार्‍याने बाजार फीच्या पावती पुस्तकाच्या माध्यमातून पैशांचा अपहार केला असल्याचे उघड झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हा बेकायदेशीर प्रकार अव्याहतपणे सुरू असल्याने यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारे पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका कर्मचार्‍याला बाजार समितीमधून बडतर्फ करण्यात आले होते. कारवाईबाबत प्रशासक फय्याज मुलाणी आणि सचिव अरुण काळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांची बाजू समजू शकलेली नाही.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज लाखो रुपयांचा अपहार केला जात असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र, या सर्व आर्थिक गैरव्यवहारात संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याने कुठलीही आणि कोणावरही कारवाई केली जात नसल्याची चर्चा बाजार समितीमध्ये सुरू होती. समितीमधील कर्मचार्‍याने अपहार केल्याने त्याला निलंबित केल्याच्या कारवाईने शेतकर्‍यांकडून वसूल केलेल्या पैशांची लूट केली जात असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
प्रशासक फय्याज मुलाणी यांनी कार्यभार स्वीकारताच वसुलीच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांची उचलबांगडी करताच दररोजच्या उत्पन्नात लाख रुपयांपेक्षा अधिक भर पडल्याने मुलाणी यांनी वसुलीबाबत चौकशी सुरू केली. यामध्ये बाजार फी वसूल करण्यासाठी असलेली पावती पुस्तके चेक केली असता, सुनील जाधव नामक कर्मचार्‍याच्या नावावर काही महिन्यांपासून अनेक पावती पुस्तके घेतलेली दिसून आली. मात्र, त्या पावती पुस्तकाच्या माध्यमातून वसूल झालेली रक्कम बाजार समिती कार्यालयामध्ये भरणा केली नसल्याचे आढळून आले. याबाबत मुलाणी यांनी अधिक चौकशी करून सुनील जाधव याला बाजार समितीच्या सेवेतून निलंबित केले आहे. यापुढे जाधव याची खातेनिहाय चौकशी करून त्याच्याविरोधात कोणती कारवाई करायची, याबाबत निर्णय घेतला जाईल.
पैशांचा अपहार केल्याचे उघड
गेल्या काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे सूर्यवंशी नामक एका कर्मचार्‍याने पावती पुस्तकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केल्याचे उघड झाल्याने त्याची अधिक चौकशी न करता त्याला सेवेतून बडतर्फ करून वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपली चमडी वाचविण्याचे काम केले होते. त्याचवेळी त्या कर्मचार्‍याविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून चौकशी झाली असती तर अनेक मोठे मासे गळाला लागले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *