कॉंग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांचा राजीनामा

नाशिक : प्रतिनिधी
राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या शिबिरात ‘एक व्यक्ती-एक पद’ या तत्त्वाची यापुढील काळात अंमलबजावणी करण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींनी केल्यानंतर काल कॉंग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आहेर हे प्रदेश कार्यकारिणीवरही उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आहेर हे गेल्या सात वर्षांपासून नाशिक शहराध्यक्षपदावर होते. दीड वर्षापूर्वी त्यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाली. मात्र, तरीही ते या पदावर कायम होते. मध्यंतरी नवीन शहराध्यक्ष निवडीच्या वावड्या उठल्या, मात्र पुन्हा गटातटाच्या राजकारणामुळे हा प्रश्‍न मागे पडला. उदयपूर येथे झालेल्या शिबिरात एक व्यक्ती-एक पद या तत्त्वासाठी 9 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याच्या आतच त्यांनी पायउतार होणे पसंत केले.
नवीन अध्यक्ष कोण?
शरद आहेर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. या पदासाठी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी रांग आहे. मध्यंतरी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरमित बग्गा यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची शहराध्यक्षपदावर निवड होण्याची घोषणा होता होता राहिली. या पदासाठी कॉंग्रेसकडून राहुल दिवे, हेमलता पाटील, वसंत ठाकूर, भारत टाकेकर, शैलेश कुटे तसेच माजी नगरसेवक राजेंद्र बागूल यांच्याही नावाची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *