सिडको : प्रतिनिधी
सरकारवाडा पोलिस ठाण्यात मार्च महिन्यात दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपी स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात याला मंगळवारी (दि. 29) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने खरात याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खरात याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. संबंधित प्रकरणाची सुनावणी न्यायालयातील बाबर यांच्या समक्ष झाली. या सुनावणीदरम्यान पोलिसांकडून तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. खरात याच्याविरुद्ध नाशिकसह सिन्नर, कोपरगाव, अहिल्यानगर, शिर्डी आदी ठिकाणी फसवणूक आणि महिला अत्याचाराशी संबंधित विविध गुन्हे दाखल असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध 18 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक प्रकरणातील आरोप आणि त्याची कायदेशीर स्थिती स्वतंत्र आहे. सरकारवाडा पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्ती तसेच इतर बाबींची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे. पोलिस कोठडीच्या कालावधीत या प्रकरणातील तपास पुढे नेण्यात येणार आहे.
दरम्यान, सरकारवाडा पोलिसांकडून 2 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या पत्रकार परिषदेत खरात याच्याविरोधातील प्रकरणे व तपासाबाबत पोलिसांकडून अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
Fraudster Ashok Kharat remanded to two days’ police custody.