दुष्काळाच्या छायेत राज्य मंत्रिमंडळाचा दिलासादायक निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि. 24) 14 विषयांवर निर्णय झाले. दुष्काळ, सिंचन, शिक्षण, ठेवीदारांचे संरक्षण आणि कामगार कल्याण या सगळ्यांना स्पर्श करणारे हे निर्णय आहेत. सर्वांत मोठा निर्णय शेतकर्यांसाठी आहे, तर सर्वांत मोठी गुंतवणूक नंदुरबारच्या सिंचन प्रकल्पासाठी आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यातील 33 जिल्ह्यांतील 42 लाख 30 हजार 783 शेतकर्यांना तीन महिने मोफत धान्य दिले जाणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील, पण थेट रोख लाभ (डीबीटी) योजनेचा लाभ न मिळणार्या, दारिद्र्यरेषेखालील शेतकर्यांसाठी, मोफत धान्य देण्याचा निर्णय आहे. प्रतिव्यक्ती, प्रतिमहिना तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू असे पाच किलो धान्य दिले जाईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घरातले धान्याचे संकट कमी व्हावे, हा यामागचा हेतू आहे.
महसूल खटल्यांसाठी ‘एक जिल्हा, एक अपील’
महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाज आधुनिक करण्यासाठी दोन बदल झाले. पहिले, रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम लागू होणार. म्हणजे महसूल खटल्यांचा ऑनलाइन मागोवा, तारीख, निकाल यांचे व्यवस्थापन होईल. दुसरे, एक जिल्हा, एक अपील ही तरतूद येणार आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मध्ये सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे. शेतजमीन, सातबारा, वाटणी, हद्द यांसारख्या खटल्यांत सामान्य माणसाला कमी फेर्या माराव्या लागाव्यात, हा यामागचा उद्देश आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भत्त्यात भरीव वाढ
आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकणार्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना असे नाव आहे. ईबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थी लाभार्थी असतील. भोजन, निवास आणि निर्वाह भत्ता या तिन्हींमध्ये सुधारित दराने वाढ होईल. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या या निर्णयाने, होस्टेलचा खर्च वाढल्याने विद्यार्थ्यांना होणारा आर्थिक ताण कमी होईल.
शालार्थ प्रणालीत नोंद असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी नवीन सुविधा सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थां(एनबीएफसी)मार्फत आर्थिक सक्षमीकरण सुविधा मिळणार. शालेय शिक्षण याचा तपशीलवार आराखडा नंतर जाहीर करणार
आहे.
दोन विद्यापीठांच्या कायद्यात एकसमानता
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अधिनियम, 1997, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989 या दोन्ही कायद्यांमध्ये बदल करण्यास मंजुरी मिळाली. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, बांधकाम समिती, वार्षिक अहवाल आणि लेखे याबाबतच्या व्याख्यांमध्ये एकसमानता आणली जाणार आहे.
ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ
खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांना आता शासकीय महाविद्यालयांप्रमाणेच सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
माथाडी, हमाल आणि खासगी सुरक्षा रक्षकांसाठी कायद्यात बदल
कामगारांच्या हिताशी संबंधित दोन कायद्यांमध्ये सुधारणेला मंजुरी मिळाली. यात, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम याचा समावेश आहे. कामगारांच्या नोंदणी, कल्याण निधी आणि कामाच्या अटी यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे.
अॅक्युपंक्चरबाबत निर्णय
अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीला राष्ट्रीय सहायक आरोग्य सेवा व्यावसायिक आयोग कायद्यातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे या उपचार पद्धतीच्या नियमनाबाबत वेगळी भूमिका घेतली जाणार आहे.
मुद्रांक शुल्कात सुसूत्रता
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 32(ब) आणि 53(1अ) मध्ये बदल करण्यास मंजुरी मिळाली. याबाबतचे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडले जाणार आहे. यामुळे लवाद (अभिनिर्णय) फी आणि अपील फी यांच्या दरात एकसमानता येईल, असा सरकारचा दावा आहे.
ठेवीदारांची फसवणूक करणार्यांची मालमत्ता जप्त होणार
आर्थिक फसवणूक करणार्या संस्थांविरुद्ध कारवाई जलद करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय झाला. असे प्रकरण 90 दिवसांत निकाली काढण्याची कालमर्यादा राहील. यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमात बदल करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबणार नाही, अशी अपेक्षा आहे.
खासगी अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायदा येणार
राज्यातील खासगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी सर्वसमावेशक कायदा तयार होणार आहे. महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा विधेयक, 2026 प्रारूपाला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे. विधिमंडळात प्रस्ताव मांडण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन, शुल्क, शिक्षक भरती आणि प्रशासन यासाठी एकच स्पष्ट चौकट तयार करणे, हा उद्देश आहे.
Free food grains for farmers for 3 months
सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : प्रतिनिधी…
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार पुणे : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्र. 4…
- सचिन अहिरराव नाशिक महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्यांवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. पण त्याआधी बरीच…
- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…
- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…
- सीमाताई मराठे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.…