धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय म्हणणार्यांना बावनकुळेंचे उत्तर
नागपूर : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेवरून अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली आहे, सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे, अशी कबुली दिल्यानंतर योजना बंद होणार की काय, अशी भीती लाडक्या बहिणींमध्ये पसरली होती. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूरजवळील कोराडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट स्पष्टीकरण दिले – काही काळ आर्थिक ताण येतो, हे खरे आहे. पण राज्य सरकार तो ताण निवळण्यास सक्षम आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, पुढील वर्षी त्यातून मार्ग काढला जाईल. पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट ही योजना अधिक मजबूत करण्याचे काम सरकार करेल.
झिरवाळ यांच्या वक्तव्यावर महायुतीतूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होते, झिरवाळ यांनी असे बोलणे टाळले असते तर बरे झाले असते. लाडक्या बहिणींनीच आपल्याला सत्तेवर आणले आहे, ज्यांचे पैसे आले नाहीत तेही मिळून जातील, तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ते झिरवाळ यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत, योजनेमुळे अनेक बहिणी कामाला लागल्या आहेत, योजना बंद होणार नाही, असे स्पष्ट केले होते. बावनकुळे यांनी याच पत्रकार परिषदेत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बोअरवेल आणि टँकरच्या दरांवरही इशारा दिला. 15 डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोदण्यावरील बंदी उठवली असताना 70 हजारांच्या कामासाठी एक लाख 20 हजार रुपये मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्या असून, बोअरवेलचे दर 70 हजारांच्या पुढे जाऊ देऊ नयेत, टँकरचालकांनीही अवाजवी पैसे घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. शेतकर्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यापेक्षा चर्चेसाठी यावे, दुष्काळ निवारण समितीचा अध्यक्ष म्हणून आपले दालन खुले आहे आणि येत्या बुधवारी यावर बैठकही आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, सध्या योजनेची वस्तुस्थिती अशी आहे – पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात, 2,100 रुपयांपर्यंत वाढीचा निर्णय अद्याप झालेला नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. ई-केवायसी पडताळणीनंतर सुमारे 92 लाख नावे वगळली गेली असून आता सुमारे दीड कोटी महिला सक्रिय लाभार्थी आहेत, आणि ई-केवायसी पुन्हा सुरू झाल्याच्या व्हायरल मेसेजेसना सरकारने खोटे ठरवून कोणत्याही अनोळखी लिंकवर आधार, ओटीपी देऊ नये, असा इशारा दिला आहे.
‘Beloved Sister’ (Ladki Bahin) will become stronger
हॉटेल यात्री, जनता आणि फिजी फॉक्सवर कारवाई नाशिक : प्रतिनिधी शहरातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री…
गंगाजलाचा कलश आणि पशुपतिनाथाचं रुद्राक्ष-चंदन; मोदी-शाह यांच्यात श्रद्धेची ‘भेट’ नवी दिल्ली : प्रतिनिधी भारत आणि…
- अश्विनी पांडे शहरातील हॉटेल्समध्ये अस्वच्छता, भेसळयुक्त व दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन…
- गोरख काळे बारा कोटींचा हिशेब मागताना सभागृह डोक्यावर घेणारे स्थायी समितीचे सदस्य अचानक शांत…
दि. 22 ते 28 नोव्हेंबर 2026 मेष : यश मिळेल हा आठवडा नवीन विचार, सकारात्मक…
पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे. मानवी जीवनापासून शेती, उद्योग आणि पर्यावरणाच्या संतुलनापर्यंत प्रत्येक गोष्ट…