मैत्रीचं पदवी प्रमाणपत्र नसतं; आठवणी असतात

– ज्योती हांडगे

कॉलेज संपल्यावर हातात पदवी येते. फोटो काढले जातात. सगळे हसतात. कॉन्टॅक्टमध्ये राहू असं प्रत्येक जण म्हणतो. त्या दिवशी सगळं खूप सुंदर दिसत असतं, पण खरंतर त्या दिवसाचा सर्वांत मोठा भाग कागदावर लिहिलेला नसतो.

कारण कॉलेज आपल्याला फक्त शिक्षण देत नाही ते माणसं देतं.
चार वर्षांच्या प्रवासात काही लोक अचानक आयुष्याचा भाग बनतात. सुरुवातीला फक्त रोल नंबर माहिती असतात आणि नंतर त्यांच्याशिवाय दिवस पूर्णच वाटत नाही. कोण नोट्स शेअर करतं, कोण वाढदिवस आठवण ठेवतं, कोण फक्त काय झालं? विचारून दिवस हलका करतं.
मैत्रीची गंमत अशी असते – तिचं कुठलंही प्रमाणपत्र मिळत नाही. मार्कशीटमध्ये तिचे मार्क नसतात. फेअरवेलला तिचं वेगळं नाव घेतलं जात नाही. पण वर्षानुवर्षांनी मागे वळून पाहिलं की सर्वात आधी तेच चेहरे आठवतात.
लेक्चरमध्ये काय शिकवलं होतं ते विसरलं जातं, पण कोणासोबत शेवटच्या बाकावर बसलो होतो, कोणासोबत कॅन्टीनमध्ये एक चहा शेअर केला होता, कोण रडताना शांत बसून ऐकत होतं – हे सगळं लक्षात राहतं.
कॉलेज संपतं आणि आयुष्य पुढे जातं. कुणी नोकरीत व्यस्त होतं, कुणी दुसर्‍या शहरात जातं, कुणी कमी बोलायला लागतं. पण खरी मैत्री रोजच्या मेसेजवर टिकत नाही ती आठवणींमध्ये जिवंत राहते.
मग अचानक जुना फोटो दिसतो. एखादा व्हॉइस नोट सापडतो. ग्रुपवर कशी आहेस? असा मेसेज येतो आणि लक्षात येतं – अंतर वाढलं, वेळ बदलला पण काही नाती अजूनही तिथेच उभी आहेत.
कधीकधी वाटतं – पदवी मिळाली नसती तरी चाललं असतं पण ही माणसं भेटली नसती तर कॉलेज अपूर्ण राहिलं असतं.
कारण शेवटी आपण कॉलेजमधून बाहेर पडताना फक्त प्रमाणपत्र घेऊन येत नाही
आपण काही लोक, काही हसू आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी घेऊन येतो.

Friendship comes with no degree certificate; there are only memories.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *