आई ते नेशन बिल्डर… गृहिणीच्या श्रमाला अखेर न्याय?

– देवयानी सोनार
भारतीय समाजव्यवस्थेचा पाया कुटुंबसस्था असेल तर त्या कुटुंबसंस्थेचा कणा म्हणजे त्या घरातील गृहिणी असते. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या दिव्यापर्यंत घरातील प्रत्येक गोष्ट सुरळीत चालावी यासाठी निःस्वार्थीपणे काम करणारी व्यक्ती म्हणजे गृहिणी. मात्र, या श्रमाचे मूल्यांकन करण्याची वेळ येते तेव्हा तिचे काम कर्तव्य म्हणून गृहित धरले जाते; काम म्हणून नाही. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गृहिणीच्या कामाचे मासिक मूल्य 30 हजार रुपये मान्य करीत त्यांना ’हाउसवाइफ ’ऐवजी ’नेशन बिल्डर’, असे संबोधले आहे. हा निर्णय केवळ न्यायालयाचा निकाल की, गृहिणीच्या श्रमाला खरी आर्थिक ओळख देणारा बदल ठरेल, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महिलांच्या योगदानाचा सन्मान केवळ त्यागमूर्ती म्हणून गौरविण्यात नसून तिच्या श्रमाची खरी किंमत ओळखण्यात आहे. घरकाम हे कामच नाही, ही मानसिकता ओळखण्याची वेळ आता आली आहे. घरातील महिला आर्थिकदृष्ट्या कमावत नसली, तरी ती कुटुंबासाठी अमूल्य मूल्य निर्माण करीत असते.ती कमावती नसली तरी पगाराने नाही, पण आयुष्याने सर्वांत श्रीमंत करणारी नेशन बिल्डर असते.
घरातील आई किंवा महिला जी गृहिणी, हाउसवाइफ, होममेकर अशा गोंडस नावाने तिला ओळखले जाते. तिच्या श्रमाचे मोल न जाणता तिला गृहित धरले जाते. ती आई, महिला, घरातील महत्त्वाचा घटक असलेल्या; परंतु कोणताच मान न धरता जिला कायम गृहित धरले जाते तिच्या बाबतीत नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने गृहिणीच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करत घरगुती श्रमांना आर्थिक मूल्य असायला हवे, असे निरीक्षण नोंदवले.
एका अपघातातील भरपाई प्रकरणात न्यायालयाने गृहिणीच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. मात्र, हा मुद्दा केवळ एका न्यायालयीन प्रकरणापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येकाच्या जीवनाशी, वास्तवाशी निगडित जोडलेला आहे.
सन 2017 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत मानुषी
छिल्लर हिला कोणत्या व्यवसायाला सर्वाधिक पगार मिळायला हवा? असा प्रश्न आयोजकांकडून विचारण्यात आला होता. त्यावर तिने आई हे उत्तर दिले होते. कारण आईचे काम केवळ जबाबदारी नसून प्रेम, त्याग आणि निःस्वार्थी सेवेतून उभे राहिलेले आयुष्य असते.
नोकरदार महिलेला, पत्नीला समाजात सन्मान, आदर मिळतो. कमावती आहे हा टॅग असल्याने तिच्या श्रमाची कदर केली जाते. घरातील कामासाठी कामवाली बाईला स्वयंपाक, धुणीभांडी, लादी पुसणे, केरकचरा, साफसफाई आदींसाठी मुुंह मांगे दाम द्यायला तयार असतो; परंतु तेच काम करण्यासाठी गृहिणीला तिचे कर्तव्य आहे. तिला दुसरे काय काम आहे? घरकाम म्हणजे इतरांच्या दृष्टीने शून्य मेहनत, अशी मानसिकता अजूनही आहे. याला कारण पूर्वापार चालत आलेली पुरुषसत्ताक पद्धती. ही मानसिकता आजही कायम आहे. पुरुष, महिला दोघेही कमावते असले, तरी कामावरून आल्यावर स्वयंपाक महिलेनेच करायचा असतो, हे अगदी बिंबवल्यासारखे घरातील इतर सदस्य वागवतात. ती महिलाही कितीही दमूनभागून आली तरी घरातील कामे आपलीच जबाबदारी असून, आपण कुठे कमी पडायला नको, हा मनावरचा पगडा कायम असल्यासारखे न थकता सर्व करत असते. आता काही प्रमाणात या गृहित धरण्याला सोशल मीडिया, सिनेमा यांतून जनजागृती केली जात आहे. परिणामी तिच्या श्रमाचे, योगदानाचे सेलिब्रेशन महिला दिन, मदर्स डे साजरे करून केले जाते. तसे पहिले तर महिलेचा सन्मान केवळ महिला दिनापुरता, सोशल मीडियावरील पोस्टपुरता किंवा भाषणापुरता नको. तिच्या कामाची दखल निर्णयांमध्ये सहभाग, विश्रांतीचा अधिकार आणि भावनिक आधारही तितकाच महत्त्वाचा आहे.
एक महिला सकाळी घरात सगळ्यांआधी उठून कोणाचा डबा, कोणाची औषधे, मुलांच्या शाळेची तयारी, ज्येष्ठांची काळजी, घरातील स्वच्छता, नातेवाइकांची उठबस, सणवार, खर्चाचा हिशोब, एकल महिला असल्यास पुरुषांप्रमाणे कमावण्याचीही जबाबदारी. या सर्वांचे केंद्र अनेक घरांत एक महिला असते. विशेष म्हणजे, तिच्या कामाची वेळ निश्चित नसते. सुटी नसते आणि कामाचे कौतुकही तिच्यासाठी नसते. आजच्या काळात महिला केवळ घर सांभाळणारी नाही तर घराची व्यवस्थापक, समुपदेशक, स्वयंपाकी, शिक्षिका, परिचारिका, आर्थिक नियोजन आणि संकटातील मोठा आधारस्तंभ असते. ती
स्वतःचे दुखणे, थकवा बाजूला ठेवून घरातील प्रत्येक सदस्याच्या गरजा ओळखते. घरातील व्यक्ती वेळेवर कामावर, शाळेत, आयुष्यात पुढे जाऊ शकते. कारण घरात कुणीतरी शांतपणे सगळे सुरळीत जबाबदार्‍या पार पाडत असते.
खरे पाहिले तर घरातील कमावती व्यक्ती यशस्वी होण्यामागे एका महिलेचे योगदान असते. ती घराची जबाबदारी उचलते म्हणून इतरांना बाहेर जाऊन काम करता येते. मुलांच्या शिक्षणापासून ते संस्कारापर्यर्ंत आणि ज्येष्ठांच्या आधारापासून ते आर्थिक, भावनिक स्थैर्यापर्यंत तिची भूमिका महत्त्वाची आहे.
कारण घर उभे राहते ते विटा-सिमेंटने नाही, तर महिलेच्या संयम, प्रेम आणि कष्टाने. म्हणूनच ती केवळ हाउसवाइफ, होममेकर नाही, तर ती आहे नेशन बिल्डर!
सर्वोेच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे खरोखर गृहिणीच्या कामाचे मूल्यमापन होणार का? हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण न्यायालयाने दिलेले हे मूल्य प्रामुख्याने नुकसानभरपाईच्या प्रकरणासाठी संदर्भ म्हणून आहे. याचा अर्थ प्रत्येक गृहिणीला प्रत्यक्ष 30 हजार रुपये पगार मिळणार, असा नाही. आपल्या देशात अजून घरकामाला औपचारिक रोजगार म्हणून मान्यता नाही. त्यामुळे गृहिणींना नियमित वेतन, निवृत्तिवेतन किवा सामजिक सुरक्षा मिळण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गृहिणीच्या श्रमाला नवा सन्मान देणारा आहे. आता समाज आणि शासन त्या दिशेने किती ठोस पावले उचलते यावरच या निर्णयाचे यश अवलंबून आहे.

From mother to nation-builder… Finally, justice for a homemaker’s labor?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *