इंधन साठेबाजांचा शोध घ्यावा

मुख्यमंत्र्यांचे आदेश : राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी
पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चिततेचे सावट असतानाच, राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 26) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात इंधनाची कोणतीही अधिकृत टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मागणीत अचानक झालेल्या प्रचंड वाढीमुळे राज्यात कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा संशय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा बेकायदेशीर साठा करणार्‍या आणि काळाबाजार करणार्‍या साठेबाजांचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी गृह आणि पुरवठा विभागाला संयुक्तपणे दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या राज्यात सामान्य सरासरीच्या तुलनेत पेट्रोलची मागणी 23 टक्क्यांनी, तर डिझेलची मागणी तब्बल 52 टक्क्यांनी वाढली आहे. काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये तर ही परिस्थिती अधिक गंभीर आहे; उदाहरणार्थ, अकोला जिल्ह्यात डिझेलच्या मागणीत चक्क 154 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये इंधनाची मागणी 70 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. इतकी अवाढव्य आणि अतिरिक्त मागणी असूनही सरकारकडून त्या-त्या भागांमध्ये वाढीव इंधनाचा पुरवठा सुरळीतपणे केला जात आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी इंधन संपल्याच्या तक्रारी येत असल्याने यामागे मोठ्या प्रमाणावर साठेबाजी व काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Fuel hoarders should be searched.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *