डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
एखाद्या देशाला किव्हा समुदायाला गुलाम बनवायचे असेल तर त्या देशातील जनतेला व समुदायातील लोकांना दहशत, दारू, देहवासना, लूटमार आणि सट्टेबाजी या पंचसूत्रीत अडकवून ठेवा. जनतेला शस्त्राच्या धाकाने जीव मुठीत धरून जगायला भाग पाडायचे, मद्य आणि मादक पदार्थांच्या नशेत धुंद ठेवायचे, स्वतःचे आणि सभोवतालच्या परिस्थितीचे भान हरपून ठेवायचे, तर्कशुद्ध विचार करण्याच्या अवस्थेत येऊ द्यायचे नाही. पुरुषांना मादीचा (महिलांच्या) नाद लावायचा आणि मादीला लाचार करून आपली हवस भागवण्यासाठी भाग पाडायचे.
जनतेची लूट करून सरकारी खजिने भरायचे, आणि गरीब जनतेला पैशांसाठी लाचार करून जुगारी आणि सट्टेबाज बनवायचे. अशा प्रकारे क्रूरकर्मी शासकांनी वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवले. अनंत काळापासून, कळत नकळत सर्वच राज्यकर्त्यांनी या सर्व सूत्रांचा वापर केलेला असून आजही हेच सूत्र बघायला मिळताय. तुम्ही म्हणाल, मी कुठे कुणाच्या गुलामगिरीत आहे? मी तर स्वतंत्र आहे, आपला देशही स्वतंत्र आहे. कुठली गुलामगिरी आणि कसले काय? खरंच का? जरा विचार करा…!
हल्लीच्या काळात एखाद्या देशाचे नुकसान करायचे असेल तर त्यावर सैनिकी हल्ले न करता वेगळ्या पद्धतीचे हल्ले केले जातात. जैविक, मानसिक, आर्थिक व तत्सम निर्बंध घालून नुकसान केले जाते. कोरोना महामारी सारखे जैविक हल्ले आपण अनुभवले. यामुळे संपूर्ण जगाला त्याचे दुष्परिणाम बघायला मिळाले, प्रत्येक देशाचे आणि प्रत्येक नागरिकाचे अतोनात नुकसान झाले, काहींचे तर अत्यंत वाईट हाल झाले.
अशा प्रकारे हल्ल्यांचे एक-एक नवीन तंत्र विकसित होत आहे. यात नवीन भर म्हणून, मोबाईल फोनद्वारे विविध ऑनलाइन / ऑफलाईन गेम्स, फ्री / पेड गेम्स बनवून त्यामाध्यमातून तरुण पिढीला अनुत्पादक कामांत व्यस्त ठेवणे, त्यांना निष्क्रिय बनवणे, पैसे लावून खेळ खेळण्यास भाग पडून जुगारी बनविणे, पैसे गमावल्याने आर्थिक नुकसान करणे, लोकांच्या मानसिकतेशी आणि भावनांशी खेळून अल्प काळात कोट्यवधी रुपये लाटणे, ऑनलाइन आर्थिक लुटमारी, स्वविकास आणि देशाच्या विकासात व्यत्यय आणणे यासाठी विविध सोशल साईट्स, प्लॅटफॉर्मस, ऑनलाइन गेमिंग अँप्स बनवून देशाच्या भावी पिढीलाच अपंग करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. यामुळे देशाचे किव्हा जनतेचे नुकसान होत आहे, याच्याशी काही देणे-घेणे नाही. फक्त पैसा कमवायचा, हेच उद्दीष्ठ ठेऊन ऑनलाइन हल्ले केले जात आहे.
आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटींच्या पार गेलेली आहे. त्यात बारकाईने बघितले तर १५ ते २० या वयोगटात असलेल्यांची संख्या ८.८% म्हणजे १२.३ कोटी इतकी आहे, तर शिक्षण घेऊन कामधंद्याला लागलेल्या म्हणजे १५ ते २४ वयोगटातील तरुणांची संख्या १७.७%, म्हणजेच २४.७ कोटी इतकी आहे. त्यात १३ कोटी मुले आणि ११.७ कोटी मुली आहेत.
दुसरा वयोगट २५ ते ४०, जो नुकताच आपल्या नोकरी किव्हा व्यावसायाच्या सुरवातीच्या टप्प्यात असतो. ती २४.३% म्हणजे ३४ कोटी इतकी आहे. यात १७.६ कोटी पुरुष आणि १६.३ कोटी महिला आहेत. हे दोन्ही वयोगट तसे अल्लड, नासमज, अपरिपक्व किव्हा भौतिक सुखांना बळी पडणारे, असे म्हणू शकतो. चाळीशी नंतर तसेही आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या आणि जबाबदाऱ्या वाढल्याने समजदारपणा, जबाबदारपणा, आणि शहाणपणा वाढतो. परंतु १५ ते ४० वर्षांचे तरुण, विशेषतः मुले भरकटण्याची शक्यता अधिक असते. हे गणितं सांगण्यामागे विशिष्ठ कारण आहे.
जर आपल्या देशातील १५ ते २४ वर्ष वयातील, शिक्षण घेणारे २५ कोटी तरुण विद्यार्थी व २५ ते ४० वयोगटातील काम करणारी ३४ कोटी तरुण जनता, असे १४० पैकी ५९ कोटी नागरिक या मोबाईलच्या आहारी गेली तर काय होऊ शकते, हे मी वेगळे सांगायला नको. यातील निम्मेच लोक मोबाईल खेळतात, असे जरी गृहीत धरले तरी ३० कोटी नागरिक मोबाईलच्या जाळ्यात अडकले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सरासरी ४ तास मोबाईल वापरला तरी रोज १२० कोटी मानवी तास वाया जातात, हे भारतासारख्या विकासाभिमुख देशासाठी खूप मोठे नुकसानदेई आहे.
मोबाईलमध्ये तरुणांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे अँप्स आहेत. सर्वांत मोठे जाळे समाज माध्यमांचे (सोशल मीडिया) आहे. व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टा, पिनट्रेस्ट, टंब्लर, टिंडर, यासारख्या अँपवर चॅट, स्टेटस, रिल्स, स्टोरी, शॉर्ट व्हीडिओ बघण्यात आणि वाचण्यात तासंतास वेळ वाया जातो. सोशल मीडियावर फोटो, व्हीडिओ अपलोड करण्यासाठी काय काय नाही ते उद्योग केले जातात. याकामी वेळ खर्च होतोच ना. या व्यतिरिक, तरुणांना वेड लावणारे डेटिंग अँप्स देखील खूप प्रचलित होत आहेत. तरुण मुले – मुलींना एकमेकांसोबत जवळची मैत्री वाढवण्याचे काम या अँप्स द्वारे चालते. विशेषतः शहरी भागात अशा अँप्सचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवतो.
आपल्या देशाचे भविष्य याच गटातील जनतेवर निर्धारित आहे. पहिला गट हा शिक्षण घेणारा आहे, तर दुसरा गट आपल्या शैक्षणिक, बौद्धिक, कल्पक आणि सृजनशील क्षमतेच्या जोरावर देशाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावणारा आहे. यात मुलं- मुली, स्त्री-पुरुष दोघांचेही योगदान आहे. हल्ली, एक गोष्ट मला एकसारखी खटकते. ही पिढी, विशेषतः या वरील दोन वयोगटातील नागरिक, मोबाईल च्या आहारी जातांना दिसत आहे.
सोशल मीडियाचे जसे फायदे, तसे काही नुकसानही आहेच. मुलांच्या मानसिकता आणि स्वभावात बदल होतांना दिसतो आहे. आता मोबाईलच्या माध्यमातून घराघरात आणि खिशाखिशात जुगाराचे अड्डे होतांना दिसत आहे. काही वर्षांपासून मोबाईल वरील गेम्सची क्रेझ कमालीची वाढली आहे. त्याचे प्रोमोशन देखील तितक्यात जोरदार पद्धतीने केले जात आहे. गेम्स, गेम्स पर्यंत मर्यादित असते तर समजू शकतो, परंतु, आता ते पैसे लावून गेम्स खेळले जातात, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
यापूर्वी, पबजी, पोकेमॉन, फ्री फायर सारखे ऑनलाइन आणि ऑफलाईन गेम्सने मुलांना अक्षरशः वेड लावले होते. मुलं त्या गेम्सच्या आहारी जाऊन, आत्महत्या केल्याच्या बातम्या देखील ऐकायला आल्या होत्या. आता तर रमी, तीन पत्ती, लुडो, चेस, कॅरम, सारखे घरगुती खेळांनाही ऑनलाइन उपलब्ध करून पैसे कमावण्याचे साधन बनवले आहे. त्याच बरोबर क्रिकेट, फुटबॉल, हॉकी सारखे मैदानी खेळही मोबाईलच्या डब्ब्यात उतरले आहे.
खेळ वाईट नाही, मोबाईल गेम्स ही वाईट नाही. परंतु, त्याचे अतिप्रमाण काळजी करायला लावणारे आहे व त्यात आता पैसे लावून खेळता येते ही गोष्ट खूपच चिंताजनक आहे. हे गेम्स खेळणारे बहुतांश लोक तरुण आहेत. नववी दहावी पासून स्मार्ट फोन वापरायला सुरू होते. म्हणजे वयाच्या १५-१६ वर्षांपासूनच. घरातील व्यक्ती काही गेम्स खेळायला शिकवत नाही, परंतु, शाळा कॉलेजातील मित्र मैत्रिणींकडून माहिती मिळते. सुरवातीला गेम्स खेळायला मजा वाटते, करमणूक म्हणून बरंही वाटतं, परंतु ही करमणूक कधी सवयीमध्ये परिवर्तित होते, कळतंच नाही. मग त्याची लत लागते.
पैसे लावून खेळले की जुगाराचे व्यसन लागते. हे घातक आहे. दिवसेंदिवस या खेळांची लोकप्रियता वाढते आहे, आणि असे म्हंटले जाते की भविष्यातही ती वाढणार आहे. लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे हे सर्व गेम्स जुन्या आणि लोकप्रिय भारतीय खेळांशी मिळतेजुळते आहे. दुसरे असे की ऑनलाइन असल्याने तुम्ही इतर खेळाडूंसोबत हे गेम्स खेळू शकता, तुम्ही टीम बनवून खेळू शकता, त्यामुळे मुलांची उत्सुकता अधिकच वाढते. एकदा मोबाईल हातात घेतला की कित्येक तास त्यात गुंग होतात, हे मुलांनाही कळत नाही, आणि त्यांच्या पालकांनाही कळत नाही. (क्रमशः)
*