डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
मागील दोन लेखांत मोबाईल आणि स्मार्टफोन मुळे काय काय होऊ शकते, यावर आपण चर्चा केली. व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टा, पिंट्रेस्ट, टंबलर, टिंडर यासारख्या सोशल मीडिया साईट्स वरील चॅट्स, पोस्ट्स, स्टोरी, रिल्स, तसेच मोबाईल वरील विविध गेमिंग अँप्स, बेटिंग अँप्स, डेटिंग अँप्स, वेबसिरीज, ओटीटी, न्यूज चॅनेल्स यामुळे तरुण पिढी बळी पडते आहे.
भारताचे भविष्य असलेल्या जनतेचे करोडो मानवी तास वाया जातात. तरुणाई भरकटली जात आहे. इंटरनेट, वेबसाईट्स, मोबाईल अँप्स, बँकिंग अँप्सच्या अज्ञानामुळे लाखो लोकांची फसवणूक करणारे हॅकर्स, सायबर क्रिमीनल्स रोज करोडो रुपयांची लूट करत आहेत. मोबाईलचा वापर वाढणार आणि या गोष्टी अधिक प्रमाणात होणार हे निश्चित. याला आळा कसा बसवायचा, आपला आणि आपल्या मुलांचा वेळ वाया जाऊ नये याकरिता काय करावे, मोबाईलचे व्यसन कसे सोडवायचे, आपले पैसे कसे सुरक्षित ठेवायचे असे प्रश्न तुम्हाला पडले असणार. बघूया, काय करता येईल…!
आजवर जे काही नवीन शोध लागले, लावले गेले, किव्हा ज्या ज्या वस्तूंची निर्मिती केली गेली, त्यामागे एकच उद्देश होता, तो म्हणजे मानव जातीचे कल्याण. मग तो विजेचा शोध असेल किव्हा निर्मिती, विमानाची असेल, मोटारीची असेल, जमितील धातू वायू तेल असेल, किव्हा मग ती मोबाईलची निर्मिती असेल, हे सर्वकाही मानवी जीवन अधिक सुखकर आणि सुलभ व्हावे, हा एकमेव हेतू होता आणि आहे. या वस्तूंचा किव्हा सुविधांचा वापर करून आपण आपले जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. उदा. विजेचा वापर करून आपण आपल्या घरात लाईट, फॅन, एसी, फ्रीज, टीव्ही, रेडिओ, म्युजिक सिस्टिम, ऑफिस मध्ये लिफ्ट, कॉम्प्युटर, बेल, अलार्म, इंटरकॉम यासारख्या सुविधांचा लाभ घेतो.
विमान आणि मोटरगाडीचा वापर करून जलद प्रवास करतो, नैसर्गिग वायूचा वापर करून गॅसवर स्वयंपाक करतो, तसेच मोबाईलचा वापरही अनेक प्रकारे करू शकतो. याउलट, जर विजेच्या तारेला हात लावला तर जीवानिशी जातो, विमान ट्वीन टॉवर वर आदळले तर हजारो लोकांचे प्राण घेते आणि करोडो रुपयांच्या संपत्तीची नासधूस करते, मोटार चुकीच्या पद्धतीने चालवली तर एकसिडेंट होतो. याचा अर्थ असा की, तंत्रज्ञान किव्हा वस्तू वाईट नाही, चुकीच्याही नाही, त्याचा वापर कसा होतो, त्यावर त्यात फायदा होणार की नुकसान, हे ठरते.
अणू आणि आण्विक ऊर्जेचा शोध आणि निर्मिती मानवी हितासाठी केला तर जगाचे कल्याणच होणार आहे. परंतु, त्याचा अणुबॉम्ब बनवून हल्ला केला तर काय होते, हे आपल्याला माहीतच आहे. विजेच्या सॉकेट मध्ये बोट घातले तर काय होईल हेही आपल्याला माहीत आहे. अग्नीचा वापर देवाचा दिवा लावायचा, अगरबत्ती पेटवून वातावरण सुगंधित करायचे, की अन्न शिजवायचे, की प्रकाश निर्माण करण्यासाठी कंदील व मशाल पेटवायची, की आग लावून घर आणि जंगल पेटवायचे हे आपल्यावर अवलंबून असते.
मोबाईलचेही असेच काहीसे आहे. कॉल करून संवाद साधायचा, की मेसेज करून निरोप द्यायचा, फ्लॅशचा वापर टॉर्च सारखा करायचा, की गूगल वरून माहिती मिळवायची, मॅपचा वापर करून वाट शोधायची, की मग विविध सोशल मीडिया आणि गेम्स साठी वापर करून वाट लावून घ्यायची, हे आपल्यावर अवलंबून आहे. आजपासून, मोबाईल हातात घेतांना विचार करा, की मी या डब्ब्याचा वापर माझ्या हितासाठी करणार आहे की अहितासाठी करणार. खर्ची पडणाऱ्या वेळेचा मला लाभ होणार आहे की नुकसान. अंतर्मनाचे उत्तर काय आहे, ते ऐका आणि मगच तुमचा मोबाईल ओपन करा. यामुळे, मोबाईलचा गैरवापर कमी होईल आणि कालांतराने बंदही होईल.
आपण आपल्या मुलांना जेव्हा सायकल, बाईक, कार किव्हा कुठलीही वस्तू घेऊन देतो, तेव्हा आपण खात्री करतो की त्याला सायकल, बाईक, कार चालवता येते की नाही. त्याच्याकडे ड्राइविंग लायसन्स आहे की नाही, त्याला वाहतुकीचे नियम माहीत आहेत की नाही, हेल्मेट, सीटबेल्ट वापरायचा सल्ला देतो, योग्य अयोग्य पद्धती त्याला समजावून सांगतो, अगदी तो त्या वस्तूचा वापर व्यवस्थित करतो आहे की नाही, हेही आपण अधून मधून चेक करत असतो. मग मोबाईलच्या बाबतीत आपण असं करतो का? लहान मुलाने मोबाईल मागितला की आपण किती कौतुकाने त्याला मोबाईल देतो. त्याने त्यावर काही ओपन केले किव्हा काही डाउनलोड केले की त्याचे कौतुक करतो.
परंतु, जेव्हा त्याला स्वतःहून मोबाईल वापरायची माहिती होते, तेव्हा तो तुम्हाला काही विचारत नाही, आणि सांगतही नाही. त्याला जे योग्य वाटते ते तो बघतो, शोधतो आणि करतो. त्याचे योग्य, खरोखर योग्य आहे की नाही, हे त्याला माहीतच नसते. ज्यात त्याला आनंद, समाधान, सुख, मजा, आणि कौतुक वाटेल, ते तो करतो. उदा. रस्त्यावर गाडी उजवीकडून चालवायची की डावीकडून, याबद्दल योग्य काय आहे हे आपल्याला सांगावं लागतं, त्याप्रमाणे करून घ्यावं लागतं, आणि तो योग्यच पद्धतीने गाडी चालवतो आहे, याची खात्री करतो, तसंच आपल्याला मोबाईल च्या बाबतीत करावं लागेल.
त्यासाठी, प्रथम आपल्यालाच माहीत हवं की मोबाईल मध्ये योग्य काय आहे, आणि अयोग्य काय आहे. खरा प्रॉब्लेम तिथेच आहे. आपणच मुलांसमोर व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टा चाळत बसतो, तेव्हा आपण मुलांना काय सांगणार. विशेष म्हणजे मुलं शिकवल्याने शिकत नाही. ते अनुकरण करून शिकतात. आपले मामी, पप्पा मोबाईल खेळताय (चाळताय) हे बघून त्यांनाही वाटणार की हेच योग्य आहे, त्यात त्याची काहीही चूक नाही.
कारण त्यांच्यासाठी आपण आदर्श (देव/देवी, हिरो/ हिरोईन) असतो. मुलं पालकांना कॉपी करतात. मग मोबाईलचा वापर कसा अपवाद असणार. बहुतेक घरांमध्ये आई वडील मुलांना अभ्यासाला बसवून ते स्वतः मोबाईल किव्हा टीव्ही बघतात. काही मुलांना ते आवडत नाही, रागही येतो, परंतु ते तुमच्यावर अवलंबून असतात म्हणून काही बोलू शकत नाही. जेव्हा ते स्वावलंबी होतात, तेव्हा ते त्यातील पळवाटा शोधतात, लपून छपून गोष्टी करतात, खोटं बोलतात, तुम्हाला वेड्यात काढतात.
विशेषतः, जेव्हा त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढतो, मित्र मैत्रिणी भेटतात, किव्हा कुणाच्यातरी संगतीत येतात. हे टाळायचे असेल तर, तुम्हाला स्वतःला शिस्त लावायला हवी. मुलांनी अमुक पद्धतीने वागावे, असे वाटत असेल, तर आधी तुम्ही तसे वागायला हवे. तुम्ही स्वतःपासून घरात तशी शिस्त लावावी. माझ्या मुलाने दारू, सिगारेट पियू नये, अशी इच्छा ठेवत, तुम्ही स्वतः त्याच्या समोर दारू आणि सिगारेट पिले तर तुम्हाला त्याला काही सांगण्याचा तुम्हाला कुठला अधिकार आहे का? बरोबर ना ?
सर्वप्रथम, तुम्हाला मोबाईलचे फायदे तोटे माहीत असायला पाहिजे. त्यात योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. मोबाईलची निर्मिती निश्चितपणे आपल्या हितासाठी, फायद्यासाठी, सुलभतेसाठी आणि सोयीसाठी केली गेली आहे, यात काही दुमत नाही. मग हे फायदे, सोयी काय काय आहे, ते आधी शिकून घ्या. मोबाईलचा वापर केल्याने आपले हीत कसे साध्य होईल, कुठल्या कुठल्या सोयी त्यात आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तरच तुम्ही त्याचा योग्य आणि उपयुक्त पद्धतीने वापर करू शकता.
जसे गाडी घेण्यापूर्वी ड्राइविंग क्लास लावतो, घर बांधण्यापूर्वी आर्किटेक्टकडे किव्हा इंजिनियरकडे जाऊन माहिती घेतो, प्लॅन तयार करतो, कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घेतो, तसे मोबाईलच्या योग्य वापराबाबत तज्ञ आणि माहीतगार व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्यात कमीपणा वाटून घेऊ नका. त्यासाठी वाचन करा, गूगल वरून माहिती घ्या, एखाद्या कौन्सिलर ला भेटा, चर्चा करा, जाणून घ्या आणि त्या गोष्टी अमलात आणा. सांगणे, ऐकणे आणि समजून घेणे सोप्पे असते, परंतु, कृतीत उतरविणे कठीण जाते. याबाबतीत कायमस्वरूपी बदल घडवायचा असेल, तर विषयाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. त्यावर सखोल विचार करून निर्णय घ्यावा लागेल. गोष्टी कृतीत का नाही उतरत, त्याचेही करणे आहेत, त्यावरही चर्चा करूया… पुढच्या भागात…(क्रमशः)