सिन्नरमध्ये गणरायाला जल्लोषात निरोप; सात तास मिरवणूक

14 मंडळांचा सहभाग; गणेशपेठेत गर्दी, सहा कुंडांत 1,902 मूर्तींचे संकलन

सिन्नर : प्रतिनिधी
ढोल-ताशांचा गजर, आकर्षक देखावे आणि गणेशभक्तांचा उत्साह यामुळे अनंत चतुर्दशीला सिन्नर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषाचे स्वरूप आले. गंगावेस येथून सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री बारापर्यंत सुरू होती. सात तासांच्या मिरवणुकीत 14 सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. गणेशपेठ आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
गंगावेस येथे माजी मंत्री तथा आमदार माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, सीमंतिनी कोकाटे, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते मनोज देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी व विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. लाल चौक, शिंपी गल्ली, जामा मशीद, महालक्ष्मी मंदिर, भिकुसा कॉर्नर, गणेशपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे मिरवणूक कुंदेवाडी बंधार्‍याकडे रवाना झाली.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौकांमध्ये पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बॅरिकेडिंग आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने मिरवणूक मार्गाची डागडुजी केली, तर विद्युत विभागाने पथदीप आणि वीजतारांची पाहणी केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नगरपरिषदेने शहरात सहा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. नागरिकांच्या प्रतिसादामुळे या कुंडांमध्ये 1,902 गणेशमूर्तींचे संकलन झाले. मूर्ती दान करणार्‍या घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना नगरपालिकेतर्फे जागेवरच प्रमाणपत्र देण्यात आले.
नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख आणि मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संकलन आणि निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य सभापती ललिता हांडे आणि स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे यांच्या देखरेखीखाली ही व्यवस्था राबविण्यात आली. संकलित मूर्तींचे गुळवंच रोडवरील कृत्रिम तलावात सामूहिक विसर्जन करण्यात आले. निर्माल्याचे ओला-सुका विलगीकरण करून ते खत प्रकल्पाकडे
पाठविण्यात आले.

परवानगी नाही, तरी डीजेचा दणदणाट!

मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यासाठी परवानगी बंधनकारक केली असतानाही सिन्नर पोलिसांकडे एकाही डीजेचालकाने परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. तरीही विसर्जन मिरवणुकीत डीजेचा कर्णकर्कश दणदणाट सुरू होता. अनेक डीजेंवर लेझरसदृश तीव्र प्रकाशझोतही लावण्यात आले होते. डेसिबल मीटरचा वापर झाला की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले. नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असतानाही परवानगीविना डीजे कसे सुरू राहिले, असा सवाल उपस्थित झाला आहे. उत्सवाच्या नावाखाली वाढलेला आवाज आणि तीव्र प्रकाशझोत यामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र विसर्जन मिरवणुकीत दिसून आले.

Ganaraya bid farewell with great enthusiasm in Sinnar; seven-hour procession.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *