चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधील संत गाडगे महाराज उद्यान आणि पाटीलनगर मैदान परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेतर्फे बसविण्यात आलेले बेंचेस अवघ्या दोन दिवसांत चोरीस गेल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.
संत गाडगे महाराज उद्यान व पाटीलनगर मैदानात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी हे बेंचेस बसविण्यात आले होते. मात्र, ते चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी ही बाब तातडीने नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि नगरसेविका साधना मटाले यांच्या निदर्शनास आणून दिली.
यानंतर बडगुजर यांनी तातडीने दखल घेत मनपाचे सिडको विभागीय उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांच्याशी संपर्क साधला. परब यांनी अंबड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी महापालिका अधिकार्यांसह संत गाडगे महाराज उद्यान व पाटीलनगर मैदान परिसराची पाहणी केली.
सार्वजनिक मालमत्तेची चोरी ही गंभीर बाब असून, संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यात यावा, अशी मागणी बडगुजर
यांनी केली.
दरम्यान, चोरीचा तपास सुरू असून, संबंधित आरोपींना लवकरच शोधून काढले जाईल. तसेच भविष्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे तपास
अधिकार्यांनी सांगितले.
Gang of thieves on benches in parks and fields