देवळालीत जुन्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
देवळालीगावातील गांधीधाम परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिक राजेंद्र पारचे (वय 25, रा. एनएमसी क्वार्टर, गांधीधाम, देवळालीगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल निकम, किशोर ऊर्फ किशा निकम (दोघे रा. देवळालीगाव) आणि एका अनोळखी साथीदाराविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितिक पारचे आणि संशयित राहुल निकम यांच्यात वर्षभरापूर्वी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. त्याच वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रितिक घरासमोर उभा असताना संशयित राहुल व त्याचा भाऊ आणि एक अनोळखी साथीदार दुचाकींवरून तेथे आले. त्यांनी रितिक याच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद सुरू असतानाच एका संशयिताने कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून रितिक याच्या दिशेने रोखला. धोका लक्षात येताच रितिक यांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी संशयिताने त्याच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मात्र, गोळीचा निशाणा चुकल्याने रितिक थोडक्यात बचावला.
त्यानंतर रितिक यांनी जवळील इमारतीत आश्रय घेतला. संशयितांनी तेथेही दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाल्यानंतर संशयितांनी धमकी देत तेथून पलायन केले.
घटनेनंतर गुरुवारी रितिक पारचे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास
सुरू आहे.

A youth was shot at from a village gate in Deolali over an old dispute.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *