संघटित व्हा सख्यांनो…

(भाग 2)
अनेक स्त्रीसंरक्षणविषयक कायद्यांची निर्मिती झाली. पण प्रत्येक कायद्यातून पळवाटादेखील शोधल्या गेल्या. तिला आत्महत्येस देखील प्रवृत्त केले गेले. निदान तिचा खून आत्महत्या म्हणून भासवला गेला. अतिशय खेदाने सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या स्त्रीच्या अधःपतनामागे बर्‍याच अंशी दुसर्‍या स्त्रियाच आहेत. कॉलेजमध्ये किंवा शाळेतदेखील एखाद्या मुलीच्या मागे अफेअर किंवा तिचा संबंध नसताना कोणीतरी मुलाच्या नावाने चिडवणे यामागे मुलांपेक्षा तिच्या शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुलीच जास्त जबाबदार असतात. मग अशा वेळेला त्या मुलीकडे एखाद्या तरुणाची वासनाधीन नजर वळते. आणि तिने त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न दिला तर भर रस्त्यावर तिच्यावर सिड फेकणे, तिला जाळून मारणे किंवा घातपाताचे असंख्य प्रकार अवलंबले जातात. आम्ही शाळेत असताना ‘वीणा पाटील’ नावाच्या दहावीच्या विद्यार्थिनीला परीक्षेच्या केंद्रावर अशाच एका माथेफिरूने जाळून मारले. नंतर सहा सात महिन्यातच अशाच एका व्यसनाधीन आणि वासनाधीन पुरुषाने एका महिलेच्या अंगावर बसस्टॉपवर अ‍ॅसिड फेकून मारले. विशेष म्हणजे दोघे विवाहित होते. आणि त्यांना मुलेबाळेसुद्धा होते. दोन्ही संसार उद्ध्वस्त झाले. माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचे ऑफिस सुद्धा वेगवेगळे होते. किंवा आधी ते एकमेकांला ओळखत देखील नव्हते. तो तिला बसस्टॉपवर छेडायचा. तिने कसलाही प्रतिसाद दिला नाही म्हणून चिडून त्याने तिच्या अंगावर सिड फेकले.
साक्री तालुक्यातल्या एका छोट्या गावात एका चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. बदलापूरलाही एका प्राथमिक शाळेतल्या मुलीवर बलात्कार झाला. मालेगावजवळील एका छोट्या गावात चार वर्षांच्या मुलीवर तिचे वडील, काका, आजोबा, सरपंचाचा मुलगा यांनी सतत तीन दिवस अतिप्रसंग केला. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या सर्व घटना आहेत. ऐकूनही किळस किळस येते. आणि त्या छोट्या चिमुरड्यांसाठी हृदयात प्रचंड उलथापालथ होते. कित्येक निर्भया, कित्येक मोनिका या बलात्कारी नरलांडग्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. या तर सर्व शारीरिक बलात्कारांच्याच केसेस आहेत. पण चुलीपासून, माजघरातून बाहेर निघून घरातल्या घरात किंवा रस्त्यावरही जिला सुरक्षित समजले जाते तीदेखील आजूबाजूच्या निदान शंभर नजरांच्या बलात्काराला बळी पडतच असते. घर असो की रस्ता वा ऑफिस, लग्न असो वा दुसरा कुठला समारंभ थोडी टापटीप, हलकासा मेकअप केलेली स्त्रीदेखील या नजरांच्या बलात्काराला बळी पडतच असते. बर्‍याचदा त्यांच्या अश्लील कॉमेंट्सने तिच्या हृदयाला घरेही पडत असतात. सोबत नवरा आईवडिल किंवा इतर कोणी नातेवाईक असतील तर या कॉमेंटसमुळे तिला त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे द्यावी लागतात. क्वचित घरातल्या इतरांच्या विश्वासाला तडाही जाऊ शकतो. कित्येक वेळेला नवरा बायकोचे नातेही पणाला लागते.
शेती कामगार वस्तीवर एकदा गेलो असता तिथे घरात काम करणार्‍या, लहान भावंडे सांभाळणार्‍या मुली नजरेस पडल्या. त्यांना विचारले, ‘घरकाम करून भावंडे सांभाळून शाळेत केव्हा जातात?’ त्या म्हणाल्या, ‘मासिक पाळी आल्याबरोबर आई-वडील घरी बसवतात. कारण शाळेतले शिक्षक, प्युन किंवा शाळेला भेट देणारे ऑफिसर ऑफिसमध्ये बोलावतात आणि नको तिथे हात लावतात. त्यापेक्षा घरी बसले तर घरकामही होते, भावंडेही सांभाळली जातात, आणखी दोन वर्षांनी लग्न लावून दिले जाते. त्यांच्यासारखाच गरीब असला तर वयात चार ते पाच वर्षाचे अंतर. मग त्याच्यासोबत आयुष्यभर मजुरी करणे हेच भविष्य उरते. आणि जरा बर्‍या परिस्थितीतला दहा-बारा वर्ष किंवा त्यापेक्षाही बराच मोठा एक दोन पोरांचा बाप. मग आयुष्यभर त्याच्या घरचे काम आणि त्याच्या घरच्यांची उस्तवार करत करत त्याचा पोरवडा सांभाळणे हेच तिचे प्राक्तन उरते. या सगळ्या प्रक्रियेत बर्‍याचदा तिला स्वतःच्या मातृत्वाचाही त्याग करावा लागतो. डोळ्यात टचकन पाणी आले.
टीव्ही किंवा मोबाइलमध्ये अश्लील रील्स बघून आणि त्यावरचे किळसवाणे कॉमेंट्स वाचून संपूर्ण जगात भारतीय स्त्रीची प्रतिमा प्रचंड मलीन झाली आहे. हजारो अश्लील रील्सचा रतीब मोबाइलवर रोजच्या रोज दरक्षणी येऊ घातला आहे. नवरा आर्मीतला असो की, इतर शासकीय कामावर जाणारा त्याच्यामागे त्याची पत्नी त्याच्या घरच्यांचा कसा छळ करते हे अगदी साग्रसंगीत दाखवले जाते. भारतीय एकत्र कुटुंबाची उदात्त व्याख्याच त्यामुळे बदलली आहे म्हणण्यापेक्षा मलीन झाली आहे. ज्या भारतभूमध्ये ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’, ‘गुरुदेवो भव’ या पवित्र भावना उक्तीप्रमाणेच कृतीतही उतरवल्या गेल्या, श्रद्धापूर्वक जपल्या गेल्या त्या भावनांचे लोन परदेशात पसरले. आणि त्याचे उदात्त अनुकरण तिथे होत असताना भारतात मात्र भूछत्रांगत पाळणाघरे आणि वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. परदेशी लोकांचे स्वतंत्र वागणे बघून अर्धवट माहितीच्या आधारावर पवित्र भारतभूवरील पिढी मात्र स्वैर उच्छृंखल वागू लागली आहे. परदेशी लोकांची शिस्त, कर्तव्यपरायणता, कार्यशीलता आणि विशेष म्हणजे देशप्रेम या सगळ्यावर पद्धतशीरपणे कानाडोळा केला जात आहे. परदेशात स्थायिक एका अनिवासी भारतीय व्यक्तीच्या मते लैंगिक स्वातंत्र्य भारतात जितके आहे तितके अमेरिका इंग्लंडमध्ये अजिबात नाही.
इतक्या सर्व गोष्टींचा उहापोह होत असताना एका गोष्टीचे प्रकर्षाने चिंतन करावेसे वाटते ते म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत, घरकामापासून ते ऑफिसच्या कामांपर्यंत, जन्मल्यापासून ते जन्माला घालेपर्यंत, सगळीकडेच स्त्री गृहीत धरली गेली आहे. स्त्रीने जन्माला आल्यापासून संयमित वागणे हेच समाजात अपेक्षित असते. माझी आई नेहमी म्हणायची, ‘जन्माला आल्याबरोबर मुलीचा पहिला ट्यांहा मोठा असतो. नंतर मात्र आयुष्यभर तिचा आवाज दबलेलाच असतो. मात्र जन्मास आल्याबरोबर दबलेला आवाज काढणारा पुरुष आयुष्यभर मोठ्या आवाजात अरेरावीच करतो.’
सख्यांनो एक प्रश्न मला नेहमी पडतो; चार वर्षांच्या बालिकेवर जेव्हा अतिप्रसंग होतो तेव्हा ती घरात किंवा बाहेरही एकटी कशी असते?

(क्रमश:)

Get organized, friends…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *