‘टीम इंडिया’ म्हणून एकत्र या; पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा 25 वा दिवस उजाडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी राज्यसभेत सुमारे 21 मिनिटे सडेतोड भाषण केले. पश्चिम आशियात तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धाने संपूर्ण जगाला गंभीर ऊर्जा संकटात ढकलले आहे आणि भारतावरही त्याचे परिणाम जाणवत आहेत, अशी वस्तुस्थिती यांनी स्पष्टपणे मांडले. आता येणारा काळ देशाची सर्वार्ंत मोठी परीक्षा घेणारा आहे, यात राज्यांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. ’टीम इंडिया’प्रमाणे एकत्र काम करावे लागेल, असे आवाहन मोदींनी राज्यांना केले. कोरोना काळातील एकजुटीचे उदाहरण देत मोदींनी सांगितले की, अशा संकटांचा सामना भारत यापूर्वीही एकत्रित ताकदीने करत आला आहे.
ऊर्जा आघाडीवर सरकारने उचललेल्या ठोस पावलांची माहिती देताना मोदींनी सांगितले की, पूर्वी भारत केवळ 27 देशांतून तेल-गॅस आयात करत होता; आता ती संख्या 41 देशांवर पोहोचली आहे. गेल्या 11 वर्षांत 53 लाख मेट्रिक टनांहून अधिक पेट्रोलियम राखीव साठा निर्माण करण्यात आल्याने आज भारत या संकटाला तोंड देण्यास तुलनेने सक्षम आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत बोलताना मोदींनी सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3 लाख 75 हजारांहून अधिक भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात यश मिळाले आहे. इराणमधून एकट्याने एक हजाराहून अधिक भारतीय परतले, त्यापैकी 700 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी होते. काही भारतीयांचे दुर्दैवाने बळी गेले असून जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. कूटनीतिक आघाडीवर मोदींनी सांगितले की, त्यांनी पश्चिम आशियातील सर्व प्रमुख राष्ट्राध्यक्षांशी दोन-दोन फेर्यांमध्ये थेट बातचीत केली आहे. ईरान, इस्रायल आणि अमेरिका तिन्हींशी सातत्याने संवाद सुरू आहे. नागरी पायाभूत सुविधांवर आणि वीजनिर्मिती केंद्रांवर होणार्या हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. युद्ध हे जगाचे कोणतेही समाधान नाही, केवळ कूटनीती आणि संवादच तोडगा काढू शकतो, असा स्पष्ट संदेश मोदींनी सर्व लढणार्या देशांना दिला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र मोदींच्या भाषणावर टीका करत म्हटले की, ट्रम्प यांना नक्की माहीत आहे की, मोदी काय करू शकतात आणि काय नाही. पंतप्रधानांची स्थिती कमकुवत असेल तर देशाची परराष्ट्र नीतीही कमकुवत ठरते.
ट्रम्प यांचा मोदींना फोन
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर भर दिला. डोनाल्ड ट्रम्प यांचा याबाबत फोन आल्याचे नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी या संवादाबाबत माहिती देताना सांगितले की, पश्चिम आशियातील परिस्थितीवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सहमती झाली.
If the war does not stop, it will be a difficult time for the country.