हुश्श..!! ऑफलाइन परीक्षा झाल्या एकदाच्या. ग्रॅज्युएशन बघता-बघता झाले पण. आणि आता पुढच्या दिशेने वाटचाल सुरू करण्याचे वेध लागले. पण गोडात मिठाचा खडा म्हणून की काय आलेल्या एका नातेवाइकाने काढला माझ्या लग्नाचा विषय! आणि त्या क्षणाला राग तर इतका आला की काय सांगू तुम्हाला.
म्हणजे मुलगी आहे म्हणून लग्न म्हणजे न्यू इनिंग आणि अल्टिमेट गोल आहे हे ठरवणारे तुम्ही कोण, असा प्रश्न, नाही नाही, जाब त्यांना विचारावा असे डोक्यात आले, पण मलाच माझी कीव आली. समाजशास्त्र मी शिकत असून, मला इतके तर कळायला हवे की मुली आणि लग्न याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा आहे आणि त्याचा परिणाम व्यक्तीपरत्वे त्यांच्या विचार शैलीवर पडत असतो.
लग्नाचा विषय आला म्हणजे जोडीदार निवडीचा विषय आलाच ना? या निवडीच्या वेळी देखील मुलींना किती बरे स्वातंत्र्य दिले जाते? आणि कधी ना कधी करावे. लग्न हा किती अट्टहास! आणि मग काही क्षमा बिंदूसारखे काही अवलिया चक्क सोलोगॅमीसारखी अनोखी पण भन्नाट काहीतरी करून एक नवीन मार्ग पत्करता.
ना इश्क़ का मुसाफ़िर हु
ना ही तन्हाई का साथी
ख़ुद के प्यार में बावली हूं
मैं अपनी जिंदगी का हूं बागी
सोलोगॅमी म्हणजे स्वतःने स्वतःशी केलेले लग्न. काय, असं कोणी स्वतःशी लग्न कसं काय बरे करू शकते? असा प्रश्न पडला असेल किंवा अजून देखील तुम्ही गोंधळले असाल की, ये चल क्या रहा है भाई, फिकर नॉट! सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करता येणे आणि सध्याच्या घडीला जिथे वेळ आणि जग इतके लवकर आणि झटकन बदलत आहे, अशा वेळी मी टाईम काढून स्वतःला पॅम्पर करणे ही प्रधान्याची गोष्ट झाली आहे. खुद्द से प्यार करनेका मजा ही कुछ और होता है. आणि हेच सेल्फ लव्ह आणि कंमिटमेंट जेव्हा स्वतः स्वतःस देत असतो त्यावेळी चढ-उतार, गिले-शिकवे, सुख-दुःख या सगळ्यांमध्ये जर आपण आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहतो, तर लग्न केल्यास काय हरकत, असा प्रांजळ प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
हम बेशक दिखते
अकेले हैं, लेकिन
अपने आप में ही
एक कारवां साथ
लिए चलते हैं्।
क्षमाबिंदू यांच्या लग्नावर बर्याच लोकांनी आक्षेप घेतला की, लग्न म्हणजे दोन लोकांचे मिलन असते. पण मग तसे बघायला गेलं तर लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील बंधन पण समलैंगिक जोडपे देखील लग्नबंधनात अडकू शकतात, हे दिसू लागले आहे आणि शिवाय आपण त्याला हळूहळू स्वीकारू लागले आहोत. मग, काही काळाने सेल्फ-मॅरेज हे देखील समाजाने स्वीकारले तर त्यात काही आश्चर्य नाही. औद्योगिकीकरण आणि वाढते शहरीकरण यामुळे व्यक्तिवाद/व्यक्तिस्वातंत्र्यावाद वाढू लागला आहे आणि माणसे स्वतःत परिपूर्णता शोधत आहेत. जोडीदार शोधून तो/ती आपल्याला पूर्णत्व देईल अशी अपेक्षा न ठेवता, स्वतःला जोडीदार बनवून आयुष्यभर साथ देणे म्हणजे सोलोगॅमी म्हणता येईल.
पण लग्न म्हणजे फक्त सहजीवन म्हणून बघितले गेले नाही तर पिढी पुढे चालवणे आणि लहान मुलांचे समाजिकीकरण ही मुख्य दोन कामे लग्नाच्या माध्यमातून पार पाडली जातात. आणि म्हणूनच की काय समलैंगिक लग्न आणि सोलोगॅमी यांना मान्यता मिळण्यास वेळ लागेल. पण,
खुदको कभी महसूस
कर लिया करो
कुछ रौनकें खुद से भी होती है
हे तितकेच खरे!
ऋतुजा अहिरे