चांदवड शहर परिसरात पावसाचा हाहाकार

चांदवड : वार्ताहर
चांदवड शहर परिसरात पावसाचा हाहाकार झाला. गुरुवारी (दि. 9) वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने मारलेल्या धडकेने जनजीवन विस्कळीत झालेच; शिवाय कांदा व्यापार्‍यांचे शेड, झाडे, विद्युत खांब कोसळल्याने अनेक वाहनांसह विविध वास्तू-वस्तूंचे नुकसान झाले. दरम्यान, कुठे झाड कोसळून तर कुठे पत्रा लागून अनेक जण गंभीर तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली.
दोन ते तीन तासांपासून पाऊस, वादळी वारा अन् विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी गारांचा मारा सुरूच असून, नुकसानीची ठोस माहिती समोर येण्यास आणखी काही वेळ लागणार आहे. यानंतर समोर आलेल्या नुकसानीचा आकडा प्रचंड मोठा येण्याची शक्यता आहे. शहर परिसरात सध्या वीजपुरवठा खंडित असून, पडलेल्या विद्युत खांबांची संख्या जास्त असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास देखील मोठा विलंब होणार आहे.
दरम्यान, चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे देखील एका दुर्घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात डॉ. हेमराज दळवी यांनी प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी नाशिक येथे संदर्भित केले आहे. सायंकाळी साडेचार- पाचच्या दरम्यान सुरू झालेला पावसाचा हाहाकार अंधार पडल्यावरही सुरूच असल्याने नुकसानीची ठोस माहिती समोर यायला उशीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *