एकाच दिवशी पाच सुवर्णपदके
मुंबई : प्रतिनिधी
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी काल तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई केली. तिरंदाजी, बॉक्सिंग आणि कुस्तीत ही सुवर्णपदके जिंकली आहेत. पासष्ट किलो वजनगटातील सुजीत कलकल याची कुस्ती अंगावर शहारा आणणारी होती. फक्त एका गुणाने त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.
कुस्ती सुरू झाल्यावर 9-3 असा पिछाडीवर असलेल्या सुनीलने शेवटला आक्रमक खेळ करत 10-9 ने सामना जिंकला. महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक पदकविजेत्या लव्हलिना बोरगोहेनने यजमान चीनच्या बाओ झियीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. चीनच्या बॉक्सरला तिच्याच देशात मिळणार्या मोठ्या पाठिंब्याला न जुमानता लव्हलिनाने कमालीचा संयम राखत मेरी कोमनंतर एशियन गेम्समध्ये सुवर्ण जिंकणारी दुसरी भारतीय महिला बॉक्सर होण्याचा मान मिळवला. पाठोपाठ अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोद या त्रिकुटाने महिला रिकर्व्ह आर्चरी प्रकारात बलाढ्य दक्षिण कोरियाच्या संघाला 5-3 अशा सेट पॉइंटच्या फरकाने धूळ चारत तिरंदाजीत भारतासाठी ऐतिहासिक पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावले. बॉक्सिंग रिंगमधून भारताला आणखी दोन सुवर्णपदके मिळाली. महिलांच्या 65 किलो वजनी गटात परवीन हुड्डा हिने चायनीज तैपेईच्या माजी जागतिक चॅम्पियन चेन निएन-चिन विरुद्ध अतिशय चुरशीचा सामना खेळला.
Golden ‘punch’ of Indian players