चांगले कर्मचारी संस्थेचे भविष्य घडवतात…

आपण आपल्या आई-बाबांकडून सहज ऐकतो की, माझे नोकरीचे ठिकाण म्हणजे माझे दुसरे कुटुंब आहे. कित्येकदा आईबाबा घरी कमी पण ऑफीसमध्येे जास्त वेळ असतात. काहीवेळा तर घरी सुट्टीच्या दिवशी ऑफीसची कामे करत असतात. कारण ते म्हणतात की, जेवढी माझी जबाबदारी कुटुंबाच्या भल्यासाठी आहे तितकीच संस्थेच्या प्रगतीसाठी आहे. माझे बाबाही गेले कित्येक वर्षापासून सहकारी संस्थेत काम करत आहेत. पण आजवर त्यांच्याकडून संस्थेची फक्त कौतुकच ऐकायला मिळाले आहे. संस्थेच्या प्रत्येक कामात ते स्वतःला झोकून देतात. त्यांच्या मते उत्तम कर्मचारी हा वेळेत ऑफिसला जाणे, संस्थेच्या फायद्याचा विचार करणे, प्रगतीचा विचार करणे, संस्थेला आपली जबाबदारी समजून काळजी घेणे, संस्थेच्या प्रत्येक कामात पुढाकार घेणे, अतिरिक्त कामालाही आपले काम आहे आपण करून घेऊ असे सहज बोलून ते काम पूर्ण करणे, पगाराची तक्रार न करता प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पूर्ण करणे, संस्थेवर मोठे आर्थिक संकट आले तरी कर्मचारी, व्यवस्थापन आणि कामावर विश्वास ठेवून आलेल्या अडचणी पासून दूर न जाता उलट प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहणे, कामाचा ताण असला तरी चेहर्‍यावर हास्य ठेवून ते काम आनंदाने करणे व संस्थेचे वातावरण सदैव स्वतःच्या वागण्यातून प्रसन्न ठेवणे, स्वतःच्या कामाबरोबर सहकार्यांना मदत करणे, संस्थेला सक्षमपणे उभे राहण्यास नावलौकिक मिळण्यास मदत करणे व त्या बदल्यात कोणत्याही मोठ्या पुरस्काराची अपेक्षा न करता किंवा आपल्या कर्तव्याचे जबाबदारीचे काटेकोरपणे काम करत राहणे…हे एक चांगल्या कर्मचार्‍यांचे लक्षण आहेत आणि फक्त बाबाच नाही तर माझ्या बघण्यात असेही चांगली माणसं आली आहे ज्यांनी अखंड परिश्रमाने त्यांच्या संस्थेला एक उंच शिखरावर पोहोचवले आहे.
खरंय प्रत्येक कार्यालयात असे अनेक माणसं असतात, जी गाजावाजा न करता प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आपल्या कामाचे श्रेय न मागता संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करत असतात. म्हणूनच ’चांगले कर्मचारी तक्रार करत नाही तर ते फक्त चांगले काम करतात….! त्यांच्या लेखी नोकरी करत असताना नोकरीप्रति सेवा, श्रम कर्तव्य व जबाबदारी प्रत्येक कर्मचार्‍याची असली पाहिजेत. मग तो एसीमध्ये बसून काम करणारा वरिष्ठ व्यवस्थापक असो, वरिष्ठ साहेब असो अथवा कारकून किंवा शिपाई असो. प्रत्येकाने आपले काम चोख व प्रामाणिकपणे केले पाहिजे. कारण कोणत्याही संस्थेची खरी संपत्ती तिचे इमारत यंत्रसामुग्री किंवा भांडवल नसते तर ते असते तेथील निष्ठावान, कष्टाळू, प्रामाणिक कर्मचारी….
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक संस्था प्रगतीची स्वप्न पाहते; आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक योजना, मोठ्या गुंतवणूक यांना निश्चित महत्त्व आहे. पण या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचे असते, ते कर्मचार्‍यांचे समर्पण….. पण याचा अर्थ असा नाही की चांगल्या कर्मचार्‍यांना अडचणी नसतात किंवा त्यांनी अन्यायविरुद्ध आवाज उठवू नये, उलट योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणे आणि सूचना करणे ही जबाबदारीच आहे. परंतु चांगला कर्मचारी प्रत्येक अडचणीत केवळ दोष शोधत बसत नाही. तर तो यावर उपाय काय? हा प्रश्न विचारतो. कारण, प्रत्येक जण संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा दुवा असतो. काही कर्मचारी आपली नोकरी केवळ पगार मिळवण्याचे साधन मानतात. सतत तक्रारी करतात. संस्थेच्या वस्तूंचा, साधनांचा अनावश्यक वापर करतात. संस्थेच्या वॉशरूमधील हॅण्डवॉशपासून ते संस्थेचा नफा, भांडवल या सगळ्यात अफरातफर करतात. संस्थेच्या सामाजिक प्रतिष्ठेला बदनाम करतात. संस्थेचे नाव वापरून चुकीचे गैरकाम करतात. पण या उलट काहीजण नोकरीला कर्तव्य आणि सेवाभावाची जोड देतात. अशा कर्मचार्‍यांसाठी संस्थेचे नुकसान म्हणजे
स्वतःचे नुकसान आणि संस्थेचे यश म्हणजे स्वतःचा आनंद असतो. कार्यालयातील एखादी वस्तू खराब झाली तरी त्यांना ’माझे काम नाही, म्हणून बाजूला होत नाही. किंवा एखाद्या सहकारी अडचणी असेल तर ’माझा काय संबंध? असे म्हणत नाहीत. उलट ’आपण मिळून हे काम पूर्ण करूया’ अशी भावना त्यांच्या मनात असते. संस्थेला कुटुंब मानणारा कर्मचारी कार्यालयातील प्रत्येक यशात स्वतःचा आनंद शोधतो. सहकारी कर्मचार्‍याला प्रमोशन मिळाले तर तो नाराज होत नाही, तर मनापासून अभिनंदन करतो. नव्या कर्मचार्‍याला काम समजत नसेल तर त्याला मदत करतो. एखादे काम पूर्ण करायचे असेल तर वेळेचे नियम बाजूला ठेवतो. कारण त्याच्या मनात फक्त एकच भावना असते की, आपली संस्था पुढे गेली पाहिजे…! त्याचा हा भाव, स्वभाव कार्यालयातील वातावरण आनंदी ठेवतो. उत्साही ठेवतो. सहकार्यांना प्रोत्साहन देतो व संकटाच्या वेळी दाखवलेल्या पॉझिटिव्ह अवेअरनेस प्रत्येकाला ऊर्जा देतो. अशा कर्मचार्‍यांमुळे कामाचे ठिकाण ऑफिस न राहता ते विश्वासाचे कार्यक्षेत्र बनते.
कंपन्यांमध्ये, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये येथे प्रचंड कामाचे ओझे असते. आजच्या स्पर्धात्मक आणि तणाव पूर्ण वातावरणात सकरात्मक कर्मचारी असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण सकारात्मक विचार करणारा कर्मचारी अनेकांच्या मनात नावीन्यता, कौशल्य विकास, ऊर्जा व नवीन आशा निर्माण करू शकतो. सतत आनंदी, हसतमुख, प्रसन्न राहणारा कर्मचारी कार्यालयाचे वातावरण प्रसन्न ठेवतो. असे कर्मचारी संस्थेची मोठी ताकद असतात. कारण कोणतीही संस्था-कार्यालय हे पगार मिळवण्याचे ठिकाण नसून आपल्या आयुष्याचा मोठा भाग असतो. दिवसातील अनेक तास आपण आपल्या सहकार्‍यांसोबत घालवतो. त्यामुळे विश्वास, आपलेपणा आणि आपुलकी या मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. कारण व्यक्ती व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद होऊ नयेत. शेवटी व्यक्तीपेक्षा संस्था मोठी आणि वैयक्तिक अहंकारापेक्षा संस्थेचे हित मोठे ही भावना ज्या ठिकाणी असते तिथे संस्थेची व कर्मचार्‍यांची प्रगती होत असते.
महात्मा गांधींच्या मते स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला इतरांच्या सेवेत झोकून देणे, ही भावना प्रत्येक कर्मचार्‍यांनी जोपासली तर कार्यालय केवळ कामाचे ठिकाण न राहता सेवाभावाचे केंद्र बनेल. पण मात्र चांगल्या कर्मचार्‍यांच्या सेवेची, कष्टाची त्यागाची,समर्पणाची दखल घेणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. कष्ट करणार्‍या व्यक्तींना केवळ अधिक काम देणे पुरेसे नाही.तर त्यांच्या कष्टाचे कौतुक करणे, त्यांना सन्मानाची वागणूक देणे, निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग आणि त्यांना प्रगतीच्या विविध संधी मिळायला हव्यात.
कर्मचारी जर संस्थेला आपले कुटुंब मानत असेल तर, संस्थेनेही कर्मचार्‍यांना ’मनुष्यबळ न मानता’ संस्थेची माणसे म्हणून जपली पाहिजेत.त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदत केली पाहिजेत. विशिष्ट मोबदला दिला पाहिजे. त्याच्या शारीरिक- मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या सोबतीने उभे राहून कामं केली पाहिजे. त्यांच्या हयात व त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सामाजिक संरक्षण दिले पाहिजे. त्याच्या सेवानिवृत्तीनंतर ही त्याला सन्मान दिला पाहिजे. कदाचित चांगला कर्मचारी कोणताही स्वार्थ मनात ठेवत नाही. तो फक्त वर्षांनुवर्ष संस्थेच्या विकासाची पायाभरणी करत असतो. कोणतीही तक्रार न करता तो फक्त जबाबदारी पार पाडत असतो आणि असेच कर्मचारी संस्थेच्या आधारस्तंभ म्हटले जातात. पद कोणतेही असोत, काम छोटे-मोठे असोत, संस्थेला आपले कुटुंब मानून प्रामाणिकपणे काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा त्या संस्थेच्या यशाचा खरा शिल्पकार असतो. तक्रार करणार्‍यांपेक्षा निष्ठा, कष्ट आणि समर्पणाने काम करणारे कर्मचारी संस्थेचा इतिहास घडवतात. कारण, संस्था मोठी होते ती केवळ भिंती, इमारती, नियम किंवा व्यवस्थापनाने नाही. तर त्या इमारतीत मनापासून काम करणार्‍या माणसांनी…म्हणूनच चांगले कर्मचारी तक्रार करत नाही तर ते संस्थेचे भविष्य घडवतात..!

Good employees shape the future of the organization…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *