एआय : आपण यंत्रांना हुशार करतोय की स्वतःला निर्बुद्ध?

– प्रशांत पोतदार

मागील शनिवारी मुलीच्या क्लासची पालक-शिक्षक बैठक होती. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा सुरू असताना एक मुद्दा विशेष विचार करायला लावणारा होता. अभ्यासातील एखादा प्रश्न समजला नाही, डाऊट आला किंवा एखादी समस्या सोडवता आली नाही, तर विद्यार्थी शिक्षकांकडे जाण्याऐवजी थेट एआय प्रणालींची मदत घेत आहेत. प्रथमदर्शनी हे अगदी सोयीचे वाटते. काही सेकंदांत उत्तर मिळते, विषयाचे स्पष्टीकरण मिळते आणि वेळही वाचतो. पण खरा प्रश्न असा आहे-विद्यार्थ्याला उत्तर मिळतेय की विषय समजतोय? उत्तर मिळणे म्हणजे ज्ञान मिळणे नव्हे. आणि उद्या अशीच समस्या समोर आली आणि एआय उपलब्ध नसेल, तर ती सोडवण्याची क्षमता त्याच्याकडे उरेल का? शिक्षक विद्यार्थ्याचा डाऊट केवळ दूर करत नाही. तो विद्यार्थी नेमका कुठे अडला आहे, काय समजले नाही आणि त्याची विचार करण्याची पद्धत कुठे चुकली आहे, हे समजून घेतो. प्रतिप्रश्न विचारतो, उदाहरणे देतो, पुन्हा समजावतो आणि शेवटी विद्यार्थ्यालाच उत्तरापर्यंत पोहोचवतो. ही प्रक्रिया केवळ उत्तर देत नाही ती विचार करण्याची पद्धत शिकवते. एआय मात्र तत्काळ उत्तर देऊ शकते. म्हणूनच एआय ही अत्यंत उपयुक्त तांत्रिक देणगी आहे. माहिती शोधणे, भाषांतर, लेखन, गणिती गणना, वैद्यकीय संशोधन, उद्योग, शेती, शिक्षण आणि अंतराळ संशोधन अशा असंख्य क्षेत्रांत त्याचा उपयोग होत आहे. वेळ वाचतो, मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करता येते आणि अनेक कठीण कामे सोपी होतात. पण प्रत्येक सोय माणसाला सक्षम करतेच असे नाही. काही सोयी माणसाला परावलंबी बनवतात.
विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा धोका अधिक गंभीर आहे. निबंध तयार, प्रकल्प तयार, प्रश्नांची उत्तरे तयार- सगळे काही एआय मुळे काही क्षणांत होते. पण त्या उत्तरामागे विद्यार्थ्याचा स्वतःचा विचार किती आहे? त्याने विषय समजून घेतला आहे का? स्वतःच्या शब्दांत तो विचार मांडू शकतो का? आयत्या गाईडने परीक्षा पास होऊ शकते पण आयुष्याची परीक्षा पास होण्यासाठी स्वतःची बुद्धी लागते. माणसाची विचारशक्ती केवळ उत्तरांमुळे विकसित होत नाही ती प्रश्नांमुळे विकसित होते. चर्चा, मतभेद, अनुभव, चुका आणि प्रयत्न यांतून ती अधिक सक्षम होते. म्हणूनच मानवी संवादाचे महत्त्वही कमी लेखता येणार नाही. दोन-चार माणसे एखाद्या प्रश्नावर चर्चा करतात तेव्हा प्रत्येकाचा अनुभव दुसर्‍याला नवा विचार देतो. मतभेद होतात, कधी वादही होतो पण त्यातून एखादा नवा मार्ग सापडतो. जर प्रत्येक प्रश्नाचे रेडीमेड सोल्यूशन स्क्रीनवरच मिळाले, तर माणूस माणसाशी चर्चा कशाला करेल? संभाषण कमी झाले, चर्चा कमी झाली आणि विचार करण्याची सवयही कमी झाली, तर माणूस माहितीने समृद्ध दिसेल, पण विचारांनी गरीब होत जाईल.
पूर्वी एखादी गोष्ट समजली नाही तर माणूस विचार करायचा, पुस्तक उघडायचा, कोणाला तरी विचारायचा, चर्चा करायचा, चुका करायचा आणि पुन्हा प्रयत्न करायचा. हे असे का?, यामागचे कारण काय?, याचा दुसरा मार्ग कोणता? असे प्रश्नच माणसाला पुढे घेऊन गेले. प्रत्येक शोधाच्या मागे कुतूहल होते आणि विचार करणारा मेंदू होता. मात्र, आता अनेकदा प्रश्न पडण्याआधीच उत्तर शोधण्याची घाई सुरू झाली आहे. माहिती मिळवणे आणि ज्ञान मिळवणे यात मोठा फरक आहे. एआय आपल्याला माहिती देऊ शकते, पण तिची सत्यता तपासणे, संदर्भ समजून घेणे, योग्य-अयोग्य ठरवणे आणि
स्वतःचा निष्कर्ष काढणे, हे काम माणसालाच करावे लागते. ज्ञानाची खरी प्रक्रिया प्रश्न विचारण्यात, शोध घेण्यात, चुका करण्यात आणि त्या चुकांतून शिकण्यात आहे. आज कोणतीही अडचण सोडविण्यासाठी तांत्रिक आधार घेणे, हे मोठे धोक्याचे आहे. पूर्वी एखादी समस्या आली की माणूस स्वतः विचार करायचा, अनेक पर्याय शोधायचा, प्रयत्न करायचा आणि अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करायचा. त्यातून निर्णयक्षमता, चिकाटी आणि आत्मविश्वास वाढायचा. आज समस्येचे सोल्यूशन एआय देऊ लागला आहे. आणि माणूस स्वतः विचार करण्याऐवजी तेच स्वीकारू लागला तर स्वतःच्या बुद्धीने मार्ग शोधण्याची सवयच आपण गमावून बसू.
अनेक कार्यालयांमध्ये कामकाज अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी एआयचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, त्याचा अतिरेकी वापर भविष्यात कर्मचार्‍यांच्या विचारशक्तीसाठी घातक ठरू शकतो. प्रत्येक पत्र, टिप्पणी किंवा आदेशाचा मसुदा एआय कडूनच करून घेत राहिल्यास स्वतःची लेखन व ड्राफ्टिंग क्षमता हळूहळू कमी होईल. समस्येवर स्वतः विचार करून तोडगा काढण्याची सवय कमी होईल आणि निर्णयक्षमतादेखील प्रभावित होऊ शकते. तंत्रज्ञान हे माणसाच्या बुद्धीला पर्याय नसून त्याला सहाय्य करणारे साधन असायला हवे अन्यथा सुविधा मिळवताना माणूस
स्वतःची विचार करण्याची क्षमता गमावण्याचा धोका आहे.
म्हणून एआयला थांबवण्याची अथवा एआय वापरणेही थांबवायची गरज नाही. तर गरज आहे ती त्याचा विवेकपूर्ण वापर करण्याची. एआयकडून माहिती घ्या, पण तिची सत्यता तपासा. मदत घ्या, पण विचार स्वतः करा. पर्याय घ्या, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. कारण साधन माणसाच्या हातात असावे, माणूस साधनाच्या हातात जाऊ नये. देवाने माणसाला विचारशक्तीची देणगी दिली आणि त्याच बुद्धीच्या जोरावर माणसाने एआय निर्माण केले. पण ज्या बुद्धीने एआय निर्माण केले, त्याच बुद्धीसमोर आज एआय आव्हान म्हणून उभे राहत आहे. एआय कितीही प्रगत असला तरी मानवी अनुभव, भावना, संवेदना, नाती, संस्कार आणि विवेक यांची जागा तो घेऊ शकत नाही. अंतिम निर्णय आणि त्याची जबाबदारी माणसालाच घ्यावी लागेल. कल्पना करा- प्रश्न विचारण्यासाठी एआय, उत्तर देण्यासाठी एआय, लिहिण्यासाठी एआय, समस्या सोडवण्यासाठी एआय आणि निर्णय घेण्यासाठीही एआय! मग माणूस स्वतः काय करणार? आपण बुद्धिमान यंत्रे निर्माण केली आहेत पण त्या यंत्रांमुळे आपण स्वतः निर्बुद्ध होता कामा नये. कारण माणसाला मिळालेली सर्वांत मोठी संपत्ती पैसा, संपत्ती किंवा तंत्रज्ञान नाही-त्याची विचारशक्ती आहे. एआयने माणसाच्या हातातील काम कमी करावे, माणसाच्या डोक्यातील विचार कमी करू नयेत. अन्यथा उद्याची पिढी तंत्रज्ञानाने अत्याधुनिक असेल, माहितीने परिपूर्ण असेल पण स्वतः विचार करण्याच्या क्षमतेने मात्र… निर्बुद्ध! आणि त्यापेक्षा मोठा तंत्रज्ञानाचा पराभव दुसरा कोणता?

AI: Are we making machines intelligent or ourselves mindless?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *