ज्ञानेश्वर बोडके : वसंतराव स्मृती पुरस्काराने सन्मान
नाशिक ः प्रतिनिधी
शेतकर्याची ताकद कोरोनाने दाखवून दिली आहे. जगण्यासाठी अगदी कमी पैसे लागतात. शंभर वर्षे चांगले जगता आले पाहिजे, यासाठी कोरोडोचीच शेती हवी असे नाही तर किती गरज आहे हे आधी समजून योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करून कमी शेतीतही चांगले उत्पन्न घेता येते. सेंद्रिय खतांचा वापर टाळून नैसर्गिक खते तयार करून त्याचा वापर वाढविल्यास कोणतेही आजार होणार नाहीत. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव दलालांमुळे मिळत नाही. मधली साखळी काढून टाकून शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क जास्त नफा मिळवून देण्यासोबत ग्राहक वाढण्याचीही हमी मिळते, असे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांनी सांगितले.
नीलवसंत मेडिकल फाउंडेशन ऍण्ड रिसर्च या सामाजिक संस्थेतर्ङ्गे देण्यात येणारा वसंतराव स्मृती पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, नीलवसंत मेडिकल फाउंडेशन ऍण्ड रिसर्च या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्राची पवार, वसंत खैरनार, डॉ. चंद्रकांत संकलेचा आदी उपस्थित होते.रावसाहेब थोरात सभागृहात (दि. 7) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोडके यांना डॉ. वसंत पवार स्मृती पुरस्कार नीलिमा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल, श्रीङ्गळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, नाशिकमध्ये चांगली बाजारपेठ असून, योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास येथील शेतकर्यांना निश्चितच चांगले दिवस येतील आणि आत्महत्या थांबतील. आपल्या यशस्वी प्रवासात अनेक प्रयोग करून योग्य संघटन, बनावट मालापासून वाचविण्यासाठी प्रमाणपत्र, गुणवत्तेची मानके यांची कामे करून आपला माल ग्राहकांपर्यंत चांगला पोहचावा यासाठी प्रयत्न यशस्वी केला. त्याचाच परिणाम अभिनव ग्रुप स्थापन करून कोरोना काळात थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचविला. शेतकर्यांनी ऑग्रेनिक शेती करावी, असे सांगून डॉ. वसंत पवार यांचे साामजिक काम मोठे होते. त्यांच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार मला ऊर्जा देणारा आहे, असे बोडके म्हणाले. श्रमाची शक्ती, संघटन कौशल्य याच्या जोरावर शेतीत क्रांती घडवता येते हे तुम्ही दाखवून दिले.नीलवसंत मेडिकल फाउंडेशन ही अभिनव फार्मरच्या उपक्रमात सहभागी असेल, असे पवार यांनी आश्वासन दिले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी केले. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले. डॉ. वसंत बेळे, प्रणव पवार, वसंतराव खैरनार, डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्र. द. कुलकर्णी, डॉ. अविनाश आंधळे, रवींद्र मणियार, रंजनाताई पाटील, नारायण थेटे, ओमप्रकाश कुलकर्णी, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.