नाशिक : प्रतिनिधी
आंतरजातीय विवाह केलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी प्रवर्गातील युवतीकडून ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी शासकीय-निमशासकीय योजनांचा लाभ न घेण्याचे पत्र लिहून घेतले आहे. हे पत्र सद्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, ग्रामपंचायत सदस्य आणि जात पंचायतीच्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे.
रायांबे येथील एका तरुणीने अनुसूचित जातीच्या युवकाशी विवाह केला. मात्र, हा विवाह करताना तिने आई वडिलांना विचारले नाही आणि आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरांचे पालन केले नाही. त्यामुळे भविष्यात मिळणार्या आदिवासी जमातीच्या शासकीय/ निमशासकीय योजनांचा लाभ घेणार नाही, असे अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे आम्हाला संशय आहे की, तरुणीने आंतरजातीय विवाह केला. त्याचा राग मनात ठेवून तिला शासनाच्या योजनांचा लाभ भविष्यात मिळू नये, यासाठी त्या आदिवासी समाजात छुप्या पद्धतीने कार्यरत असलेल्या जातपंचायतीने हा अर्ज तरुणीकडून बळजबरीने लिहून घेतला असावा, असे अंनिसने म्हटले आहे. विशेष म्हणजे हा अर्ज लिहून घेणार्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचासह, इतर काही ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि विविध संघटनांच्या पदाधिकार्यांच्याही स्वाक्षर्या आहेत.