मालेगाव शहरात संततधार पावसामुळे घटना
मालेगाव : प्रतिनिधी
शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शुक्रवारी (दि. 3 जुलै) दुपारी कलेक्टर पट्टा परिसरातील महारुद्र हनुमान मंदिराशेजारील एका घराचा स्लॅब कोसळून आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत अन्य तिघे थोडक्यात बचावले.
या दुर्घटनेत विमलबाई पंढरीनाथ येवले (वय 80) आणि चेतन रामचंद्र येवले (वय 20) यांचा मृत्यू झाला. येवले कुटुंबातील पाच सदस्य या घरात राहत होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सततच्या पावसामुळे घराचा स्लॅब अचानक कोसळला. घटनेच्या वेळी राजेंद्र येवले हे घराच्या वरच्या भागात काही सामान आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी स्लॅब कोसळल्याने त्यांची आई विमलबाई आणि मुलगा चेतन हे ढिगार्याखाली दबले गेले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. राजेंद्र येवले हे स्लॅबखालून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली असून पत्नी स्वयंपाकघरात असल्याने त्यांचा जीव वाचला. अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप, महसूल विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून घरातील अन्य सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, नगरसेवक मदन गायकवाड, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी, यासाठी संबंधित मंत्री, महसूल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Grandmother and grandson die after house slab collapses.