वृद्धेच्या घरातून नातवानेच केली चोरी

15 मिनिटांत लंपास केला 45 हजारांचा चांदीचा मुखवटा

सिन्नर : प्रतिनिधी
दोडी बुद्रुक येथील बिरोबा देवाच्या चांदीच्या मुखवट्याच्या चोरीप्रकरणी धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घरात एकट्या राहणार्‍या वृद्ध आजीच्या देव्हार्‍यातील चांदीचा मुखवटा चोरणारा दुसरा कोणी नसून तिचाच नातू असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. अवघ्या 15 मिनिटांसाठी आजी घराबाहेर गेल्याची संधी साधत नातवाने चोरी केली. वावी पोलिसांच्या कसून चौकशीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. चोरीस गेलेला मुखवटा जप्त करण्यात आला आहे.

दोडी बुद्रुक येथील वृद्ध महिला भामाबाई काशीनाथ शिंदे आपल्या घरात एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा काही अंतरावर स्वतंत्रपणे वास्तव्यास आहे. त्याच मुलाचा मुलगा कार्तिक भीमा शिंदे याने ही चोरी केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे गावात आश्चर्य व्यक्त होत असून, कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.
याप्रकरणी महेंद्र जगन्नाथ शिंदे यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार बिरोबा देवाचा सुमारे 578 ग्रॅम वजनाचा आणि 45 हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
घटनास्थळी जबरदस्तीने प्रवेश किंवा घरफोडी झाल्याचे कोणतेही पुरावे आढळून न आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा घरातील आणि परिचित व्यक्तींकडे वळवली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक शिंदे याच्यावर संशय बळावला. चौकशीदरम्यान त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या उलटतपासणीत त्याच्या जबाबातील विसंगती समोर आल्या. अखेर त्याने चोरीची कबुली दिली. तपासात असे समोर आले की, संबंधित वृद्ध महिला सकाळी सुमारे 7 ते 7.15 या वेळेत घराबाहेर गेल्या होत्या. याच कालावधीत आरोपीने घरात प्रवेश करून देव्हार्‍यातील चांदीचा मुखवटा चोरला. चोरीनंतर संशय टाळण्यासाठी त्याने मुखवटा उगलेवाडी-दोडी शिवारातील एका शेताच्या बांधाजवळ दगडांच्या आड लपवून ठेवला होता. आरोपीच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरीस गेलेला मुखवटा जप्त केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आजी बाहेर, नातवाची नजर देव्हार्‍यावर

वृद्ध आजी घरात एकट्याच राहत असल्याने त्यांना घरातील हालचालींची पूर्ण माहिती होती. सकाळी त्या काही कामासाठी घराबाहेर पडताच नातवाने संधी साधली. अवघ्या 15 मिनिटांत चोरी करून तो पुन्हा नेहमीप्रमाणे वावरत राहिला. मात्र, पोलिसांच्या तपासातून त्याचा डाव फसला आणि अखेर घरातीलच चोर समोर आला.

Grandson himself commits theft at elderly woman’s house.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *