खानगाव, उगाव खरेदी-विक्री केंद्रांवर होणार द्राक्षमणी लिलाव

सभापती जगताप : स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत

लासलगाव : वार्ताहर
खानगांव नजीक, उगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या सोयीसाठी यंदाही लासलगाव बाजार समितीच्या खानगाव नजीक व उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर बुधवार(दि. 18)पासून द्राक्षमणी लिलाव सुरू होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डीके) जगताप
यांनी दिली.
खानगाव नजीक व उगावसह परिसरातील नांदगाव, डोंगरगाव, रूई, धानोरे, कोळगाव, खेडलेझुंगे, धारणगाव वीर, धारणगाव खडक, नांदूरमध्यमेश्वर, गाजरवाडी, नैताळे, सोनेवाडी, श्रीरामनगर, शिवरे, शिवडी, खेडे, वनसगाव, नांदुर्डी, कुंदेवाडी, खडकमाळेगाव, सारोळे खुर्द, रानवड आदी गावांमध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय जवळच निर्माण व्हावी, यासाठी लासलगाव बाजार समितीतर्फे दरवर्षी उगाव, खानगाव नजीक, नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षमणी शेतीमालाचे खरेदी-विक्री केंद्र सुरू केले जाते.
सदर केंद्रांस परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांकडून दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यंदा खानगाव नजीक व उगाव खरेदी-विक्री केंद्रावर बुधवारपासून द्राक्षमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी परीसरातील शेतकरी बांधवांनी खानगाव नजीक व उगाव येथील खरेदी-विक्री केंद्रावर बुधवारपासून (दि. 18) दररोज दुपारी चारला आपला द्राक्षमणी हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा.
वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केली असून, द्राक्षमणी खरेदीसाठी जास्त व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकर्‍यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे. शेतकरी बांधवांनी द्राक्षमणी बाजार समितीच्या खरेदी-विक्री केंद्रांवरच विक्री करावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती जगताप, उपसभापती संदीप दरेकर व संचालक मंडळाने केले.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणार्‍या द्राक्षमणी खरेदीदारांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आलेले आहे.

अटी-शर्तीच्या पूर्ततेनंतर तत्काळ परवाना

बाजार समितीच्या खानगाव नजीक व उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी खरेदीस इच्छुक असणार्‍या नवीन व्यापार्‍यांनी लायसेन्सबाबत सर्व अटी-शर्तींची पूर्तता केल्यास त्यांना तात्काळ परवाना देण्यात येईल. इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. बुधवारी दुपारी चारला खानगाव नजीक खरेदी-विक्री केंद्रावर, तर उगाव खरेदी-विक्री केंद्रावर दुपारी पाचला होणार्‍या द्राक्षमणी लिलाव शुभारंभप्रसंगी परिसरातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व ग्रामपंचायतींचे सदस्य, द्राक्षमणी उत्पादक शेतकरी, अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार आदी घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.

Grape auction to be held at Khangaon, Ugav buying and selling centers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *