नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह असतानाच, आगर टाकळी परिसरात एका तरुणाला धक्का लागल्याच्या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ केली, तसेच त्याच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अक्षय लोखंडे व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता, अॅट्रॉसिटी कायदा आणि आर्म अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ प्रकाश पगारे (वय 26, रा. आगर टाकळी) मंगळवारी (दि. 14) रात्री 11.30 च्या सुमारास परिसरात जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत डीजेच्या गाण्यावर नाचत होता. यावेळी गर्दीत त्याचा धक्का संशयित अक्षय लोखंडे याला लागला. सिद्धार्थने तत्काळ माफी मागितली. मात्र, अक्षयने वाद उकरून काढत त्याला भररस्त्यात जातिवाचक शिवीगाळ केली. ’तुझ्याकडे बघून घेतो,’ अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.
काही वेळाने सिद्धार्थ आपल्या मित्रांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभा असताना अक्षय लोखंडे एका अनोळखी साथीदारासह दुचाकीवरून तेथे आला. तुला जास्त माज आला का? तुझा गेमच करून टाकतो, असे ओरडत अक्षयने खिशातून बंदूक काढली आणि सिद्धार्थच्या दिशेने रोखून ट्रिगर दाबला. बंदुकीचा ’कटक’ असा आवाज येताच सिद्धार्थ प्रसंगावधान राखून खाली वाकला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हा थरार पाहून सिद्धार्थचे मित्र धास्तावले आणि त्यांनी तेथून पळ काढला. अक्षयच्या साथीदारानेही खिशातून धारदार शस्त्र काढून सिद्धार्थला मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यातून सिद्धार्थने कसाबसा
स्वतःचा बचाव करत उपनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली.
सिद्धार्थ पगारे याच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी संशयित अक्षय लोखंडे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
Gun pointed directly at one person due to shock during procession