कांदा, गहू, डाळिंब पिकांचे 400 हेक्टरवर नुकसान
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील सांगवी-सोमठाणे परिसरात गुरुवारी (दि. 19) दुपारी सुमारे 3.30 ते 5 या वेळेत तब्बल दीड तास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे परिसरातील कांदा, गहू, डाळिंब व द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गारपीट व वादळी वार्यामुळे अनेक शेतांतील कांदा व गहू अक्षरशः भुईसपाट झाले. काढणीला आलेल्या उन्हाळी कांद्याला गारपिटीचा जबर फटका बसला असून, पावसामुळे भिजलेला कांदा टिकण्याऐवजी सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे
लागणार आहे.
तलाठी दिव्या आहेर यांच्यासमवेत कृषी सहायक गडाख यांनी शेतकर्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार सोमठाणे परिसरात उन्हाळी कांद्याचे सुमारे 282 हेक्टर, डाळिंबाचे 32 हेक्टर आणि गव्हाचे 92 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. तर सांगवी परिसरात कांद्याचे सुमारे 15 हेक्टर, गव्हाचे 6 हेक्टर आणि द्राक्षाचे एक हेक्टर क्षेत्र गारपिटीमुळे बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याला योग्य भाव मिळाला नाही. पुढे भाव मिळेल, या अपेक्षेने या भागातील बहुतेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. मात्र, ऐन काढणीच्या तोंडावर झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून कांद्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर अवघ्या दीड तासाच्या गारपिटीने पाणी फिरल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, रामेश्वर कोकाटे, ज्योती कोकाटे, दिलीप कोकाटे, रवींद्र कोकाटे, सर्जेराव कोकाटे, राजेंद्र कोकाटे, पोपट कोकाटे, दत्तात्रय रुकारी, मगन कदम, मच्छिंद्र धोक्रट, अशोक धोक्रट आदी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडून तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
केली आहे.
Hailstorm in Sangvi-Somthane area for one and a half hours