नाशकात सिंधी बांधवांतर्फे चेट्रीचंड उत्साहात साजरा

विविध धार्मिक कार्यक्रम, रॅलीने वेधले लक्ष

नाशिक : प्रतिनिधी
सिंधी समाजातर्फे चेट्रीचंड व सिंधी नववर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी (ता.20) विविध कार्यक्रमांत सिंधी समाज बांधवांनी सहभागी होत जल्लोेष केला. ’जय झुलेलाल’चा जयघोष करत शहर परिसरातून काढलेल्या रॅलीने लक्ष वेधले होते.
चैत्र महिन्याच्या चंद्रदर्शन दिवशी (गुढीपाडव्याला) सिंधी समाज बांधवांचा नववर्ष चेट्रीचंड उत्सव साजरा करण्यात आला. सांस्कृतिक व धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा झाला. लहानांपासून मोठ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सिंधी समाजातील हे नववर्ष असल्याने या दिवसाला धार्मिकदृष्टया अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही नाशिक सिंधी पंचायत समितीतर्फे चेट्रीचंडनिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शुक्रवारी दुपारी 3 पासून तपोवन लिंक रोडवरील श्री झुलेलाल मंदिर, नाशिक सिंधी पंचायत सभागृह येथे बहिराणासाहिब पूजन सोहळा पार पडला. दुपारी साडेचारच्या सुमारास शालिमार भागातील बी. डी. भालेकर मैदानापासून वाहनांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत दुचाकी, चारचाकी वाहने सहभागी झाली होती. सहभागांनी ’जय झुलेलाल’चा जयघोष करत आनंद साजरा केला. ज्येष्ठ, युवक, महिला असे सर्व समाजबांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. भालेकर मैदानावरून सुरुवात करत रॅली पुढे सीबीएस, अशोक स्तंभ मार्गे होत गंगापूर रोडवरील ठक्कर मैदान (मविप्र मॅरेथॉन चौक व डोंगरे वसतिगृह यांच्या मधे असलेले मैदान) येथे रॅलीचा समारोप झाला.
यानंतर श्री झुलेलाल, राधाकृष्ण यांचा भव्य स्वागत सोहळा पार पडला. श्री झुलेलाल यांची वेशभूषा भगवान मोटवानी यांनी साकारली होती. समाजाचे मार्गदर्शक डॉ.विजय महाराज सेतपाल यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान. सायंकाळी ठक्कर मैदानावर विविध कार्यक्रम, उपक्रम पार पडले. गायक जतीन उदासी यांचा सिंधी गाण्यांचा कार्यक्रम रंगत वाढविणारा ठरला. संगीताच्या तालावर थिरकत समाजबांधवांनी जल्लोष केला. या ठिकाणी लहान मुलांसाठी आनंदमेळ्याचे आयोजन केले होते. तसेच समाजबांधवांसाठी भंडारा आयोजित केला होता. विविध कार्यक्रमांनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था केली होती. रात्री उशिरा बहिराणासाहिब विसर्जनाने या उत्सवाचा समारोप झाला.
सर्व कार्यक्रम नाशिक सिंधी पंचायत समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आहुजा, मेला कमिटी अध्यक्ष दीपू धिरवानी, सर्कस कमिटी अध्यक्ष अशोक पंजाबी, पंचायत समिती उपाध्यक्ष श्याम मोटवानी, सचिव शंकर जयसिंघानी, हासानंद करमचंदानी, सुनील केसवानी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

Chetrichand celebrated with enthusiasm by Sindhi brothers in Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *