नाशिकरोडला वाढीव पाणीपट्टीविरोधात हंडा मोर्चा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
पाणीपट्टी देयक वाटपाचे खासगीकरण रद्द करावे आणि झोपडपट्टी (स्लम घोषित) नळ ग्राहकांवर करण्यात आलेली तीनपट वाढीव नळ बिल आकारणी तत्काळ मागे घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे महापालिका विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चाची सुरुवात देवळालीगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली. गुलाबवाडी, राजवाडा, तक्षशिला शाळा, सुभाष रोड, सत्कार पॉइंट, अनुराधा चौक मार्गे मोर्चा विभागीय कार्यालयावर पोहोचला. मोठ्या संख्येने महिलांनी पाण्याचे हंडे घेऊन वाढीव नळ बिलाविरोधात घोषणाबाजी केली. विभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाणीपट्टी देयक वाटपाचे खासगीकरण तत्काळ रद्द करावे. झोपडपट्टी (स्लम घोषित) नळ ग्राहकांवर महापालिकेद्वारे आकारण्यात आलेले तीनपट वाढीव नळ बिल रद्द करावे. झोपडपट्टी नळ ग्राहकांना दरवर्षी तपशीलवार व योग्य सुधारित बिल द्यावे. झोपडपट्टी घोषित नळ ग्राहकांसाठी दुर्बल घटकाचा स्वतंत्र स्लॅब तयार करून मासिक व वार्षिक आकारणी कमी दरात करावी.झोपडपट्टी भागातील नागरिकांना घरपट्टी सेवाशुल्क किंवा जागेचा पुरावा नसला तरी आधारकार्डावर नवीन नळ जोडणी देण्यात यावी. बर्माशेलवाडी परिसरात पाइपलाइन लिकेजमुळे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने जुनी पाइपलाइन बदलून नवी पाइपलाइन टाकावी. सन 2000 पूर्वीच्या घरांना घरपट्टी सेवाशुल्क लागू करावे. सर्व नळधारकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करावा. यावेळी लालचंद शिरसाठ, जिल्हाध्यक्ष अरुण काळे, आकाश भालेराव, अरुण सुर्वे, दीपक औटे, किशोर जाधव, राजू मोरे, मंदाबाई आंडागे, भारती भालेराव, मंगला पाटील, सौरव डिग्वा आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *