नाशिक : प्रतिनिधी
हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी की किष्किंदा या वादामुळे शास्त्रार्थ सभेत साधु महंतांत वादावादी झाल्यानंतर काल महर्षि पंचायत सिध्दपीठमचे महंत अनिकेतशास्त्री आणि अयोध्येचे महंत पाठक यांनी महंत सुधीर पुजारी यांच्याशी काळाराम मंदिरात भेट घेऊन वादावर पडदा टाकला. मात्र आपल्या मतांवर ठाम रहात स्वामी गोविंदानंद सरस्वतींनी नाशिककडून गुजरातकडे प्रस्थान केले.यामुळे हनुमानाचे जन्मस्थळ किष्किंधा की अंजनेरी हा मुद्दा अनिर्णयितच राहिला.
हनुमानाची जन्मभूमी अंजनेरी नसून किष्किंदा असल्याचा दावा करत नाशिकमध्ये आलेल्या स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी शास्त्रार्थ सभेत अनेक प्रकारचे दाखले देत जन्मभूमी किष्किंदा असल्याचा मुद्दा लावून धरल्यामुळे या सभेत मोठा राडा झाला होता. महंत सुधीरदास पुजारी यांनी थेट माइक उगारल्याने मोठा वाद झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ही सभा कोणत्याही निर्णयाविना गुंडाळली होती. काल बुधवारी गोविंदानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषद घेऊन महंत सुधीर पुजारी यांच्यासह इतरांवर जहरी शब्दांत टीका केली होती. तसेच हनुमानाची जन्मभूमी किष्किींदाच असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा आपण आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र, अयोध्येचे महंत पाठक आणि अनिकेत शास्त्री यांनी काळाराम मंदिरात जात महंत सुधीर पुजारी यांची भेट घेत या वादावर पडदा टाकला. त्यामुळे तूर्तास हा वाद मिटला आहे. दरम्यान, दुपारनंतर स्वामी गोविंदानंद यांनी रथासह गुजरातच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
भगवान व्यासजींच्या मताचा आदर – महंत पाठक
ब्रम्हपुराणानुसार, भगवान व्यासजींनी सांगितल्याप्रमाणे हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी असल्याने त्या मताचाही आदर करायला हवा. व्यासजींचे मत खोडुन काढु एवढा आपला अधिकार नाही आणि एवढा आपला अभ्यासही नाही त्यामुळे आपण ब्रम्हपुराणाचाही आदर करायला हवा असे अयोध्येहुन आलेल्या महंत पाठक गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वामी गोविंदानंदांचा ब्रम्हपुराणाविषयी अजब दावा
हनुमान जन्मस्थळाबद्दलचे वाद मिटुन त्यावर एकमत व्हायला हवे, वेगवेगळ्या शास्त्रांची वेगवेगळी मते असु शकतात. आपण सर्वांचे पक्ष ऐकायला तयार आहोत. ब्रम्हपुराणात काही गोष्टी लिहायच्या राहुन गेलेल्या आहेत. ब्रम्हपुराणातील त्या रिकाम्या जागा भरुन काढल्या तर हनुमानाचे जन्मस्थळ किष्किंधाच असल्याचे समोर येईल असा दावाही स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत केला.