हरसूल आश्रमशाळा सेंट्रल किचनचा पर्दाफाश

सडलेला भाजीपाला, कच्च्या पोळ्यांचे वास्तव समोर; आ. खोसकरांच्या पाहणीत उघड

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करणार्‍या सेंट्रल किचनमधील अन्नपदार्थांची हेळसांड आमदार हिरामण खोसकर यांच्या अचानक भेटीनंतर समोर
आली आहे.
या सेंट्रल किचनमध्ये सडलेला भाजीपाला आणि अपुर्‍या भाजलेल्या (कच्च्या) पोळ्या वापरल्या जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, आमदार खोसकर भेट देणार हे दोन दिवसांपासून संबंधितांना माहीत असूनही जेवण तयार करताना निष्काळजीपणा करण्यात आला. यावरून ठेकेदाराचा उद्दामपणा स्पष्ट होत असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचा संताप आमदार आणि ग्रामस्थांनी
व्यक्त केला.
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सकस जेवण मिळावे म्हणून सेंट्रल किचन ही संकल्पना अमलात आणली गेली आहे. हरसूल येथील या किचनमधून परिसरातील शिरसगाव, मुरंबी, रायते, ठाणापाडा, बोरिपाडा, देवडोंगरा, खरपडी, आडगाव, भुवन, बाडगी यांसह इतर शाळांमधील अंदाजे 2000 विद्यार्थ्यांना जेवण पुरवले जाते.
पाहणी दौर्‍यादरम्यान, या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी मागवलेला भाजीपाला सडलेला असल्याचे आमदार खोसकर यांच्या निदर्शनास आले.मोड आलेले आणि बर्‍याच दिवसांपूर्वीचे कांदे-बटाटे, तसेच अर्ध्या कच्च्या किंवा जास्त जळालेल्या पोळ्या पाहून त्यांनी तेथील ठेकेदार आणि कामगारांना तीव्र शब्दांत जाब विचारला. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भारती भोये आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

हरसूल सेंट्रल किचनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होईल अशा अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आढळून आले आहेत. हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित करणार आहे.
-हिरामण खोसकर, आमदार, त्र्यंबक-इगतपुरी

अन्नाचे नमुने घेतले सोबत

आमदार खोसकर यांनी स्वतः तेथील शिजवलेले अन्न खाऊन बघितले आणि मोड आलेले बटाटे व निकृष्ट अन्नपदार्थांचे नमुने पुढील कारवाईसाठी सोबत जप्त केले. या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आदिवासी विकासमंत्री, आदिवासी विकास विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल. तसेच विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात या गंभीर विषयावर लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे
त्यांनी सांगितले.

Harsul Ashram School Central Kitchen Scam Exposed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *