‘परिवर्तन संसार का नियम हैं ईश्चर सब देख रहा हैं।’ या गीता उपदेशानुरूप सामाजिक पातळीवर होत असलेले परिवर्तन किती विदारक बनत चालले आहे, याची जाणीव समाजाला होण्यासाठी अजून किती बळी जाणार याचा थांगपत्ता नाही. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील तीन मृत्यूंचा थरार ज्या मोबाइल कॅमेर्यातून चित्रित होऊन समाजमाध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात पसरला तोच मोबाइल आय-फोनचा हट्ट या घटनाक्रमास कारणीभूत ठरला होता. यावरून ज्या युवाशक्तीच्या हातात देशाचे भवितव्य आहे ती युवाशक्ती देशाच्या भवितव्यासाठीच्या प्रयत्नांवर स्मार्ट फोन अन् सोशल मीडियाच्या खोल गर्तेत अभिमन्यूगत अडकत चालल्याचे विदारक वास्तव आज समाजापुढे उभे ठाकले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील घटनाक्रमाचे समाजमाध्यमातून आलेले सर्व व्हिडिओ बघितले तर संपूर्ण गाव सलग तीन-चार तास एका युवकाच्या मनधरणीचा अन् त्यानंतरच्या करुण अंताचा लाइव्ह शो बघत असल्याचे दिसून येते. याबरोबरच जवळपास जाणार्या महामार्गावरदेखील वाहने थांबून हा सर्व प्रकार बघत असल्याचे दिसून येत होते. आज तरुणाईसह आबालवृद्धांंनाही स्मार्ट फोन, सोशल मीडिया, स्टेट्स, रील्स, व्ह्यूज, लाइक, कमेंट्स याचे भयानक वेड लागले आहेच. शिवाय यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विविधांगी ज्ञानाच्या भांडाराला अक्षरश: ऊतू येत आहे. यात बालवाडीपासून पदवी, पदव्युत्तर शिक्षणाच्या माहितीचे खजाने, तसेच समाजाशी संबंधित सर्वच बाबींवर ज्ञान पाजळणारे यूटयूब चॅनेल अन् त्यावर येणार्या जाहिरातींचा भडिमार पाहता स्मार्ट फोन ही गरज बनण्याऐवजी व्यसन बनत चालले आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, विविध आस्थापना यात फेरफटका मारला तर स्मार्ट फोनच्या वापराचे परिणाम मानमोडी अन् हाताची बोटे निकामी करण्याचा मार्ग प्रशस्त बनवत आहे. समाजातील छोट्या-मोठ्या कुटुंबात स्मार्ट फोनचा वापर वाढत चालला आहेच. शिवाय परस्परसंवादही स्मार्ट फोनमधूनच होऊ लागला आहे. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी स्मार्ट फोनशिवाय राहणे म्हणजे पाण्याविना मासा, अशी सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींची पार्श्वभूमी विचारात घेतली तर छत्रपती संभाजीनगरच्या घटनेच्या मुळात असलेला आय फोन कोणत्या घातक वळणावर समाजाला घेऊन जात आहे, याची प्रचिती येते. आज स्मार्ट हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. कारण फोन पे, गुगल पे, लाइव्ह लोकेशन, ट्रेन, बस वेळापत्रक, आनॅलाइन मीटिंग, महाविद्यालयांचे लेक्चर्स, तत्काळ संदेशवहन, ओटीपी यांसारख्या बाबींसाठी आवश्यकता निर्माण झाली. हे सत्य असले, तरी त्याचा अमर्याद वापर सामाजिक समस्येचे मूळ बनले आहे. समाजमाध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या घटनेबाबत आलेले विचार अन् कमेंट्स बघता मुलाच्या कृत्यावर घृणा व्यक्त होत आहे अन् आई-बापाच्या मायेचा विचारही मांडला जात आहे. सकाळी 10-11 वाजेपासूनचा हा स्मार्ट फोनच हट्ट दुपारपर्यंत सुरू असताना गिर्यारोहक पथकांशी संपर्क साधून ठेवणेही गरजेचे होते. हट्ट कोणताही असला, तरी मात्र जीवन हे अनमोल आहे, याची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. स्मार्ट फोन अन् समाजमाध्यमाचा वापर हा सकारात्मक गरजांसाठी केला पाहिजे.
मात्र, सध्याच्या सोशल मीडियाचे अॅनालिसिस केले तर विस्तवागत वास्तव समोर येते आहे. या विकृतीला आळा घालण्याची गरज आहे. कारण छत्रपती संभाजीनगरची घटना ही खरेतर हिमनगाचे टोक आहे. कारण अशा कित्येक कुणालांचे हट्ट केवळ जीवनाचा धोका पत्करू नये, या भीतीपोटी मायबाप पुरवत आहेत. पण यातून आता पालक अन् युवकांनी सजग होणे गरजेचे आहे. आपला पाल्य नेमके किती वेळ मोबाइल स्क्रीनवर असतो अन् काय बघतो, याची सर्च हिस्ट्री पालकांनी पडताळली पाहिजे. सोशल मीडियाचा वाढता वापर नियंत्रित करण्यासाठी आता इंटरनेट भारनियमनाचा मार्ग निर्माण करावा लागणार आहे. गावागावांत, घराघरांत वाढत चाललेला स्मार्ट फोनचा वापर अन् सोशल मीडियाच्या व्यसनात गुंतलेली व्यवस्था विचारात घेता आता या अतिवापराला पायबंद घालण्यासाठी कुटुंबव्यवस्थेपासून गावागावात स्मार्ट फोन वापराला अल्पविरामाचे वेळापत्रक निश्चित करायला हवे.
Has the cost of living gone down?