काँग्रेसवर राष्ट्रभक्तीचे प्रश्न उपस्थित करणार्यांना पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
नाशिक : प्रतिनिधी
काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित करणार्यांनी आधी आपल्या इतिहासाकडे पाहावे. आरएसएसच्या कार्यालयात कधी वंदे मातरम् म्हटले आहे का? तिरंगा फडकवला आहे का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचा सहभाग राहिला असून, काँग्रेसकडून वंदे मातरम् किंवा तिरंग्याचा अवमान होणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक दौर्यावर आले असता पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. काँग्रेसकडून राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज किंवा देशाच्या प्रतीकांचा अवमान होत असल्याचे आरोप केले जात असतील तर ते चुकीचे आहेत. काँग्रेसचा इतिहास स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेला असून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, मोदी सरकारच्या काळातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना चव्हाण यांनी तरुण पिढीच्या बदलत्या भूमिकेकडे लक्ष वेधले. सरकारकडून होणारे अत्याचार समाज निमूटपणे सहन करण्याची मानसिकता निर्माण होत होती. मात्र, आता जेन-झी आणि नवी पिढी अन्याय सहन करणार नसल्याचे अलीकडील आंदोलनांमधून दिसून आले आहे. तरुण आता प्रश्न विचारत असून, सरकारला त्यांची उत्तरे द्यावीच लागतील, असे त्यांनी सांगितले.
सिंहस्थासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणि विकासकामे सुरू असली तरी शहरातील रस्त्यांची अवस्था चिंताजनक आहे. समृद्धी महामार्गावरून नाशिकमध्ये प्रवेश करतानाच रस्त्यांची बिकट अवस्था दिसते. शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असून, योग्य दिशादर्शक फलकांचीही कमतरता आहे. नाशिक हे ‘खड्ड्यांचे शहर’ बनल्याचे ऐकत होतो; मात्र, आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, असे चव्हाण म्हणाले.
सिंहस्थाच्या टेंडरवरूनही टोला
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांवरूनही चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. ‘नाशिक शहरातील सिंहस्थाच्या कामांचे टेंडर अमित शहा यांनी काढल्याचे ऐकतोय,’ असा आरोप
त्यांनी केला.
Has ‘Vande Mataram’ ever been recited at the RSS office?