पाणी, अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी नमुने; 186 बाधितांवर उपचार
मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील आठवडे बाजारातील भेळभत्ता व चटणी सेवनानंतर नागरिकांना त्रास झाल्याच्या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गावात आरोग्य विभागाचे पथक तैनात करून बाधित नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच नांदगाव बुद्रुक व भेळभत्ता विक्रेता राहत असलेल्या पाटणे येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. यापूर्वीच्या पाणी नमुन्यांचा अहवाल पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्राप्त झाला आहे.
नांदगाव बुद्रुक येथे रविवारी (दि. 27) आठवडे बाजार भरला होता. या बाजारात पाटणे येथील एका विक्रेत्याने भेळभत्ता व तीन प्रकारच्या चटण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. बाजारात भेळभत्त्याचे सेवन केल्यानंतर सोमवारी काही नागरिकांना जुलाब, उलटी व मळमळीचा त्रास जाणवू लागला. प्राथमिक सर्वेक्षणात चटणीसह भेळभत्त्याचे सेवन करणार्या नागरिकांमध्ये ही लक्षणे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावाची लोकसंख्या सुमारे पाच हजार 200 असून, 975 कुटुंबे आहेत. आरोग्य कर्मचार्यांनी केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात 186 नागरिकांना संबंधित त्रास झाल्याचे आढळून आले. बाधित रुग्णांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच मालेगाव कॅम्प येथील नागरी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सामान्य रुग्णालयात 109, महिला व बाल रुग्णालयात 71, तर नागरी आरोग्य केंद्रात सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पाणी नमुने पुन्हा तपासणीसाठी
नांदगाव बुद्रुक तसेच भेळभत्ता विक्रेता राहत असलेल्या पाटणे येथील पाण्याचे नमुने यापूर्वी जैविक तपासणीसाठी मालेगाव उपविभागीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचे अहवाल पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, सोमवारी (दि. 28) पुन्हा पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
साथरोग सर्वेक्षणासाठी स्वतंत्र पथक
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदगाव बुद्रुक येथे आरोग्य विभागाचे पथक दररोज सर्वेक्षण करून परिस्थितीचा आढावा घेत आहे. गावातील साथरोग परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. बाधित नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित करून आवश्यकतेनुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
Health Department conducts survey regarding food poisoning in Nandgaon Budruk.