दुष्काळग्रस्त तालुक्यांना आरोग्यसेवेचा दिलासा

मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष आता तालुकास्तरावर

निफाड : विशेष प्रतिनिधी
दुष्काळाचा सामना करणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांसमोर शेती, रोजगार, चारा व पिण्याच्या पाण्यासोबतच आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार झाल्यास उपचारांचा खर्च पेलणे सर्वसामान्यांसाठी मोठे आर्थिक संकट ठरते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा लाभ निफाड तालुक्याला मिळणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
शासन निर्णयानुसार, खरीप हंगाम 2026 मध्ये ट्रिगर-1 अंतर्गत दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये हे कक्ष स्थापन केले जातील. संबंधित पंचायत समिती कार्यालयात कक्षाचे कामकाज चालणार असून, गटविकास अधिकार्‍यांकडून जागा व पायाभूत सुविधा दिल्या जातील. जिल्हाधिकार्‍यांमार्फत स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्‍याची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती होणार असून, त्यांना लिपिक व टंकलेखकाची मदत मिळेल. यामुळे रुग्णांना आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि शासकीय योजनांबाबत स्थानिक पातळीवरच मार्गदर्शन मिळणार आहे.
या नव्या व्यवस्थेत रुग्णांना थेट मुख्यमंत्री सहायता निधीकडे वळविण्याऐवजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, कामगार विभागाच्या योजना आणि धर्मादाय रुग्णालयातील उपचारांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाईल. रुग्ण या योजनांसाठी पात्र नसल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीसाठी संलग्न रुग्णालयांमार्फत ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यास हा कक्ष मदत करेल. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांची कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची धावपळ वाचणार आहे.

निफाडच्या समावेशाबाबत संभ्रम

तालुकास्तरीय कक्षामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळणार असून, जिल्हा मुख्यालयापर्यंत जाण्याचा खर्च, वेळ आणि त्रास वाचणार आहे. मात्र, शासन निर्णयानुसार हा कक्ष खरीप 2026 मध्ये ट्रिगर-1 अंतर्गत दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसाठीच आहे. निफाड तालुक्याचा या पात्र यादीत समावेश आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या निर्णयाचे यश कक्षांची प्रत्यक्ष सुरुवात, पुरेसे मनुष्यबळ आणि अर्ज मंजुरीतील सुलभतेवर अवलंबून राहणार आहे.

Healthcare relief for drought-affected talukas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *