लासलगावला पावसाची जोरदार हजेरी

आठवडे बाजारात शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची तारांबळ

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव येथे रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पावसाने सुमारे एक तास हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात व्यावसायिक आणि शेतकरी, ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.
22 जूननंतर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक दमदार पावसाने एन्ट्री केली. येथील रविवारी मुख्य आठवडे बाजार असल्याने परिसरातील शेकडो शेतकरी व किरकोळ विक्रेते आपला माल विकण्यासाठी बाजारात आले होते. मात्र, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचावासाठी बाजारात पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकरी आणि व्यापार्‍यांना आडोसा शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. भाजीपाला, फळे आणि इतर अन्नधान्य उघड्यावर असल्याने मोठ्या प्रमाणावर भिजले. अनेक शेतकर्‍यांचा कोथिंबीर, मेथी, टोमॅटो यांसारखा नाशवंत माल पाण्यात भिजला तसेच कपडे, कटलरी आणि इतर वस्तूंची दुकाने थाटलेल्या छोट्या व्यावसायिकांना आपला माल गोळा करायला वेळच मिळाला नाही. ताडपत्री बांधेपर्यंत बहुतांश माल ओला झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही या पावसामुळे धावपळ झाली.

Heavy rainfall in Lasalgaon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *