गणेश गितेंची माघार, मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्री महाजनांचीही शिष्टाई सफल
नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीसाठी काल (गुरुवारी) उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी माघारीचे नाट्य चांगलेच रंगले. महायुतीच्या जागावाटपात नाशिकची जागा शिंदे गटाला सुटल्यानंतरही गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपासून ते उपमुख्यमंत्री व कुंभमेळामंत्री यांनी प्रयत्न केल्यानंतर गणेश गिते यांनी महायुतीचा धर्म पाळत माघार घेतली. त्यांचे बंधू मात्र उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता तीन उमेदवार रिंगणात उरले आहेत. खरी लढत अपक्ष गोकुळ गिते आणि नरेंद्र दराडे (शिंदे गट) यांच्यातच होणार आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात माघारीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
दरम्यान, ज्यांनी बाप काढला त्यांच्यासाठी माघार नाही, अशी भूमिका अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी घेत आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेरच्या क्षणापर्यंत चित्र अस्पष्ट होते. मात्र, माघारीची मुदत संपल्यानंतर तीन उमेदवारी रिंगणात आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) नरेंद्र दराडे आणि गोकुळ गिते, प्रसाद हिरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. गोकुळ गिते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असली तरी त्यांचे बंधू गणेश गिते यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
विधान परिषद निवडणुकीतून कोण माघार घेणार याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. तसेच माघारीसाठी महायुतीतील शिवसेना व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही जोरदार प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले असले, तरी गोकुळ गिते यांनी आपली उमेदारी कायम ठेवल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
गुरुवारी (दि. 4) विधान परिषद निवडणुकीच्या माघारीची मुदत होती. पहिल्या दीड तासात माघारीसाठी कोणताही उमेदवार आला नाही. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे, किशोर दराडे यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, येवल्याचे माजी नगरसेवक रामदास दराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
दुपारी दोनच्या सुमारास इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्रचे मोहम्मद खालीद अब्दुल रशीद यांनी माघार घेतली, तर कुणाल दराडे यांनीदेखील माघार घेतली.
दरम्यान, गणेश गिते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यानंतर समर्थकांनी मोठी घोषणाबाजी केली. गिते यांच्या समर्थकांनी गोकुळ गिते यांना फोन केला. ’गणेशभाऊ आले आहेत. आपल्याला माघार घ्यायची आहे. तर तुम्ही या,’ असे सांगितले. त्यावर गोकुळ गिते यांनी, ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी माघार का घ्यायची, असा प्रश्न केला.
यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणादूण गेला होता. माघारीची मुदत संपण्यास अवघ्या 20 मिनिटांचा कालावधी बाकी असताना गणेश गिते निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनाकडे गेले. यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते हे परवेझ कोकणी यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर परवेझ कोकणी यांनीही माघार घेतली. मात्र, गणेश गिते यांनी माघारीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत माघार घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलणे झाले. कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकाशी बोलताना आई- वडिलांवरून शिवीगाळ केली. त्यामुळे हा विषय वाढला. हे निवडणुकीच्या आधीच आमचा बाप काढायला लागले! आमचा राजकीय बाप देवेंद्र फडणवीस आहेत, हे विसरू नका, असे गणेश गिते म्हणाले.
माघारीसाठी वरिष्ठांंची दमछाक
नाशिक विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मोठी दमछाक केली. मात्र, काही अंशी या प्रयत्नांना यश आले असले, तरी निवडणूक मात्र बिनविरोध होऊ न शकल्याने महायुतीचे चांगलेच टेन्शन वाढले आहे. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून माघारीच्या मुदतीपर्यंत प्रयत्न करण्यात आले. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे 15 मिनिटे बाकी असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलेश बोरा यांना फोन लावत सविस्तर माहिती घेतली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणेश गिते यांना फोन केला. त्यानंतर गणेश गिते यांच्याकडून गोकुळ गिते यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र गोकुळ गिते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली.
…तर ते म्हणतील ती शिक्षा भोगायला तयार : कुणाल दराडे
विरोधक षडयंत्र करण्यात यशस्वी झाले. मी अत्यंत सुसंस्कृत व संयमी आहे. गणेश गिते व गोकुळ गिते यांना माझं सांगणं आहे की, तो ऑडिओ फॉरेन्सिकला द्या. तो आवाज माझा असेल तर ते म्हणतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, अशी भूमिका कुणाल दराडे यांनी मांडली.
सर्वांचे लक्ष गिते बंधूंवर
माघारीच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष गिते बंधूंकडे लागलेेले होते. माघारीला अर्धा तास बाकी असतानाही गिते बंधूंची भूमिका काय असणार, हे चित्र स्पष्ट न झाल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर माघारीला 20 मिनिटे बाकी असताना गणेश गिते जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी माघार घेतली. मात्र, गोकुळ गिते माघार घेण्यास येणार, अशी चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत रंगत होती. मात्र, माघार न घेण्याच्या भूमिकेवर गोकुळ गिते ठाम राहिल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार, हे स्पष्ट झाले आहे.
आमचा बाप काढल्याने माघार नाही : गोकुळ गिते
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी नाशिकमध्ये ’हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. कुणाल दराडे यांनी फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिल्यामुळे गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. धमकी दिल्याने माघार न घेण्याच्या भूमिकेवर गोकुळ गिते ठाम राहिले.
कुणाल दराडे यांनी फोनवरून संपर्क साधून गोकुळ गिते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. आमचा बाप काढल्यामुळे मी नाराज आहे. अशा प्रकारे धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी बतावणी करत गोकुळ गिते निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले.
सहा जणांची माघार; निवडणूक तिरंगी होणार
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या माघारीच्या मुदतीनंतर तीन उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गिते, अशी होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर नऊ उमेदवार रिंगणात होते. छाननीतही सर्व नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामुळे माघारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी (दि. 4) नऊपैकी सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. नरेंद्र दराडे, गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. अपक्ष विष्णू रुंजा म्हैसधुणे, गोरख बोडके, कुणाल दराडे, इंडियन सेक्युलर
लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्रचे मोहम्मद खालीद अब्दुल रशीद, अपक्ष गणेश गिते व परवेझ कोकणी यांनी माघार घेतली.
High voltage drama of the return in the Legislative Council elections