महामार्ग की मृत्यूमार्ग – भाग २

डॉ. संजय धुर्जड.*
अस्थिरोग तज्ञ, सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
कुठल्याही नवीन महामार्गावर सुरवातीला अपघातांची संख्या अधिक असते, कारण लोकांना त्या रस्त्याबद्दल कुतूहल असते, त्यावरील थरार अनुभवायचा असतो, नियम माहीत नसतात, वेगाने गाडी चालवण्याची सवय नसते, अनिभाव नसतो. कधी तर फाजील आत्मविश्वास ही जीवघेणा ठरतो. रस्ता कुठलाही असो, गाडी कुठलीही असो, काही ठराविक नियम, काळजी आणि खबरदारी घेणे आपल्या हाती असते. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना या प्रकारे स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी माझे काही टिप्स आहेत, ते पळाले तर निश्चितपणे तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता.
लेनची शिस्त पाळावी*
एका लेन मधून दुसऱ्या लेनमध्ये गाडी न्यायाच्या आधी, दोन्ही बाजूंच्या आरशांमध्ये बघावे. जवळपास कुठली गाडी नाहीए, याची खात्री करूनच आपली लेन बदलावी. तत्पूर्वी, आपली गाडी कुठली आहे, तिचा वेग किती असू शकतो, याचे भान ठेवून गाडी योग्य त्या लेनमध्ये चालवावी. ८० किमी ताशी, किव्हा त्यापेक्षा कमी वेग असेल तर डाव्या लेनमधून चालावे, १०० च्या वेगाने चालणार असाल तर मधली लेन असावी आणि १२० किमी किव्हा त्यापेक्षा जास्त वेग असल्यास उजव्या लेनमध्ये गाडी लावावी. हायवे वर एन्ट्री किव्हा एक्झिट करतांना, एकेक लेन बदलावी. अचानक आणि विनाकारण लेन बदलू नये, याची खबरदारी घेतल्यास अपघाताची शक्यता टळते.
२. वेगाची मर्यादा पाळावी*
आपले दळणवळण मंत्री गडकरी साहेबांनी म्हंटले होते की, १४० च्या स्पीडने गाडी चालत असतांना तुम्ही थर्मास मधील चहा, कपात ओतू शकता, इतक्या चांगल्या प्रतीचा हायवे असणार आहे, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तो आहे देखील. परंतु, याचा अर्थ असा नाही की तुम्ही १४० किव्हा अधिक वेगाने गाडी चालवावी. गाडीची कंपनी, तिची बनावट, सेफ्टी फीचर्स, टायर साईज, अत्याधुनिक लाईट्स आणि ब्रेकिंग सिस्टिम, वेगवान स्थितीत गाडीचे स्थैर्य, गाडीत बसलेल्या लोकांची संख्या किव्हा गाडीतील लोड, ड्रायव्हर चा अनुभव, त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था, त्याची सावधगिरी या सर्व बाबी लक्षात घेऊन वेग मर्यादा ठरवावी.
३. टायर चेक करावे*
९०० पैकी २६% अपघात हे टायर पंचर किव्हा टायर
फुटल्याने झाले आहेत, म्हणजेच चार पैकी एक अपघात टायरमुळे झाले असल्याचे स्पष्टपणे कळते. याचा अर्थ असा की टायर हा गाडीचा खूप महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित भाग आहे. टायर का फुटतात, याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. जेव्हा गाडी वेगाने चालते, तेव्हा टायर आणि रोड यांच्यात घर्षण होऊन ऊर्जा (heat) निर्माण होते. ती ऊर्जा टायर आणि रोड यांत समसमान विभागली जाते. टायर आकाराने छोटे असते, त्यामुळे प्रत्येक एका चक्राला टायरच्या भाग पुनःला रोडला घर्षण करतो, तर रोड एकदाच टायरच्या संपर्कात येतील, म्हणून जास्तीत जास्त ऊर्जा टायरला पोहोचते. त्यामुळे टायर तापतात. त्यात भर म्हणून हल्ली काँक्रिट चे रोड असतात.
काँक्रिट आणि त्यातील स्टील दिवसा आधीच तापलेले असते, त्याचीही ऊर्जा टायरला पोहोचते. (पूर्वीचे डांबरी रोड उन्हातील ऊर्जा शोषल्यामुळे वितळायचे, त्यामुळे ते काँक्रिट प्रमाणे तापत नसत). टायरचे तापमान वाढले की आतली हवाही तापते, आणि ती हवा प्रसारण पावते. त्यामुळे टायरमधील हवेचा दबाव (एअर प्रेशर) वाढतो. सोबतच टायर गरम झाल्याने ते रबर कमकुवत होते. हवेचा दाब वाढणे आणि रबर कमकुवत झाल्याने टायर फुटण्याचे प्रकार होऊन अपघात होतात. असे होऊ नये याकरिता टायर थंड असतांना प्रेशर चेक करून ते 10 – 15% कमी दाबाने हवा भरावी, तसेच दर १०० – १५० किमी वर १०-१५ मिनिटं थांबावे व टायर थंड होण्यासाठी वेळ द्यावा.
४. भावनांना आवर घालावा.*
मोकळ्या रस्त्यात स्टंटबाजी करणे काहींना खूप आवडते, तर काहींना वेगाचा थरार अनुभवायला आवडते. सुरक्षेचे साहित्य वापरून संपूर्ण सुरक्षा उपाययोजना करूनच स्टँट्स करावे, त्यासाठीचे प्रशिक्षण घेतले असेल तर उत्तमच. परंतु, माहिती, प्रशिक्षण, अनूभाव आणि कौशल्य नसतांना स्टँट्स करणे म्हणजे केवळ मूर्खपणा आणि जीवाशी खेळ समजावा. असे प्रकार टाळलले तर आपला स्वतःचा, आपल्या जिवाभावाचा आणि रस्त्यावर चालणाऱ्या इतरांचा जीव सुरक्षित राहील, हे कायम स्मरणात असावे.
५. गाडीची नियमित सर्व्हिसिंग करावी.*
गाडी हे एक यंत्र आहे. त्याला देखभालीची गरज असते. वापर केल्याने त्याचा घसारा होत असतो. घसारा होणारे हजारो स्पेअर पार्ट्स असतात. त्यातला कुठला पार्ट निकामी होऊन धोका देईल, काही सांगता येत नाही. प्रत्येक कंपनीने आपापल्या गाड्यांची नियमित तपासणी आणि मरंमत करावी, याची काही नियमावली बनवलेली असते. आपण त्याप्रमाणे आपल्या गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग केल्याने ऐन वेळी तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता कमी होते. माहितीनुसार ४७% वेळा गाडीचा अपघात हा कुठल्यातरी तांत्रिक बिघाडामुळे होतो. तसा अपघात टाळायचा असेल तर नियमित सर्व्हिसिंग अत्यावश्यक आहे.
अधिक माहिती पुढील अंकात…(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *