ऑटिजम… कधी ऐकलंय का ?

*
जागतिक ऑटिजम डे निमित्त…
डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
२ एप्रिल दरवर्षी एक विशिष्ठ आजाराबद्दल जनजागृतीसाठी पळाला जातो. चाळीशीच्या दशकात लहान मुलांमध्ये एक विशेष वर्तणूक बघितली गेली. सामान्य मुलांच्या तुलनेत काहींचा बौद्धिक विकास वेगळ्या पद्धतीने होतो, असे निदर्शनास आले. मंद गतीने विकास होणे, अथवा विकासच न होणे, हे वेगळं आहे. विशेषतः सामाजिक आणि भावनिक विकास न झाल्याने इतरांशी संवाद न करणे, आपल्यातच गुंतून राहणे, स्वतःतच मग्न राहणे, असे काही लक्षणे असलेला हा नवीन  विकार गेल्या काही दशकांपासून वाढीस लागलेला, परंतु तितकाच दुर्लक्षित असलेला हा विकार म्हणजे “ऑटिजम”. या विकाराबद्दल जनजागृतीच्या उद्देशाने हा दिवस पळाला जातो आहे, म्हणून आजचा हा लेख.
लहान मुलांसोबत खेळायला कुणाला आवडत नाही. त्यांचे ते निरागस वागणे, स्वच्छंद स्वभाव, ते बोबडे बोल, आरडाओरड, उड्या मारणे, हट्टीपणा, त्यांना अंगाखांद्यावर खेळवणे, धावपळ करणे आपल्या सर्वांनाच खूप आवडते. असा मुलांचा नैसर्गिक विकास होत असतो. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची आपण कौतुक करतो, टाळ्या वाजवतो, दाद देतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो.
परंतु, जर मी तुम्हाला अशी मुलं दाखवली जी फारशी कुणाशी बोलत नाही, कुणाशी संभाषण करत नाही, कुणाकडे बघत नाही की कुणाच्या नजरेला नजर मिळवत नाही. जी मुलं कुणासोबत खेळत नाही, एकटेच खेळतात, एकाच खेळ वारंवार खेळतात, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करतात, तेच तेच करतात, त्यात त्यांना बदल करायला आवडत नाही, जे आहे तेच हवं असतं, बाकी काही नको असतं, टोकाचा हट्टीपणा असतो. अशा मुलांशी तुम्हाला खेळायला, बोलायला आणि जवळ घ्यायला आवडेल का ? तुम्ही अशा मुलांना काय म्हणाल ? तुम्ही म्हणाल की अशी मुलं वेडी असणार. परंतु, नाही. ही मुलं वेडी नसतात. त्यांच्या मेंदूची रचना विशिष्ठ पद्धतीची असल्याने त्याचा विकास वेगळ्या पद्धतीने होतो. काय असते हे ऑटिजम, जाणून घेऊया.
ऑटिजम ला मराठी समानार्थी शब्द आहे “आत्मकेंद्रीपणा” किंव्हा “स्वमग्नता”. दुसरा शब्द जास्त वर्णानिय आहे. ऑटिजम ग्रस्त मुलं स्वतःतच मग्न असतात. त्यांना सामाजिक संबंध तसेच भावनिक संबंध विकसित करता येत नाही. विचार करा, आपली मुलं पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने आपण त्यांच्या संगतीचा आनंद घेतो, त्यांचे लाड करतो, त्यांना हवे ते देतो. अशी मुलं असल्याबद्दल देवालाही धन्यवाद देतो.
परंतु, ऑटिजमग्रस्त मुलांचे पालक त्या मुलांसोबत कसे वागत असतील. आपली मुलं आपल्याशी नीट बोलत नाही, नजरेला नजर मिळवत नाही, हसत नाही, स्वतःला व्यक्त करत नाही, कुणाकडे लक्ष देत नाही, एकलकोंडे बनतात, हट्ट करून बसतात, तेच तेच करतात, कुणाकडे जात नाही, कुणाला जवळ करत नाही, कुणाला दाद देत नाही, कुणाशी देवाणघेवाण करत नाही, एकटेच खेळायला आवडते… अशा पालकांची मानसिक स्थिती काय होत असेल, विचार करा…! कदाचित थोड्या फार प्रमाणात तुम्हीही अशी मुलं आणि त्यांचे पालक तुमच्या आजूबाजूला बघितलीही असणार. परंतु, आपला समाज अशा मुलांवर मतिमंद असल्याचा शिक्का मारून त्यांना आयुष्यभरासाठी खितपत पडून मरण्यासाठी सोडून देतात. हे दुर्दैव…!
ऑटिजम बाबत अनभिज्ञता याला कारणीभूत आहे. आपण याबद्दल कधी काही ऐकलेलंच नाही, म्हणून आज “जागतिक ऑटिजम डे” निमित्त याबद्दल जाणून घेऊया, आणि इतरांनाही ही माहिती फॉरवर्ड करूया. तुमच्या या छोट्याशा कृतीने एखाद्या मुलाचं आयुष्य सावरण्यासाठी मदत होऊ शकते. यासाठी काही मूळ बाबी आपल्याला समजून घ्यायला हव्या. मुलांचा विकास बहुआयामी असतो. शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, वाचा, भाषा… ई. शारीरिक विकासातील ठोस हालचाली म्हणजे पालथे पडणे, रांगणे, उभे राहणे, आधार घेऊन चालणे, विनाआधार चालणे हा शारीरिक विकास पहिल्या काही महिन्यांच्या विशिष्ठ टप्प्यात होत असतो.
बौद्धिक विकास, वर्तणूक विकास, भावनिक विकास तसेच भाषा विकास हे सोबत होत असते. हास्य करणे, चेहऱ्यावरील हावभाव बदलणे, आवाजाला, व्यक्तीला, वस्तूला प्रतिसाद देणे, एकल शब्द उच्चार जसे बा, मा, दा, ना तसेच द्विय शब्द जसे मामा, बाबा, नाना, काका, पापा बोलण्याचे कौशल्य विकसित होण्याचे टप्पे ठरलेले असतात. तरही ठराविक विकासाचे टप्पे ठरलेले असतात, २-५ टक्के मागे पुढे होत असते. परंतू जर मुलाच्या जडणघडणीत काही आक्षेपाहृ बदल आढळला तर त्वरित आपल्या बाळाच्या डॉक्टरांना कळवणे अत्यंत गरजेचे आहे.
बाळाच्या मेंदूचा विकास वयाच्या पहिल्या तीन वर्षांत साधारणपणे ८०-९०%  झालेला असतो, तर पाच वर्षांपर्यंत ९५% पूर्ण होतो. त्यानंतरचा विकास म्हणजे त्यात फक्त वाढ होत असते. त्यामुळे या विकारावर मात करायची असेल आणि त्या मुलाला न्याय द्यायचा असेल तर वेळेत निदान होणे आणि वेळेत उपचार सुरू होणे अत्यंत महत्वाचे आहे. वयाच्या ५ वर्षांनंतर त्यात फारसे काही करण्यासारखे उरत नाही. यासाठी पालकांनी सतर्क रहावे.
आपण मुलांमध्ये बारकाईने लक्ष दिले तर वयाच्या दोन, अडीच वर्षांपर्यंत ऑटिजम सदृश लक्षणे दिसतात. जर मूल हसत नसेल, नजरेला नजर मिळवत नसेल, कुणाकडे आज कशातही लक्ष देत नसेल तर डॉक्टरांना याबद्दल कळवणे गरजेचे आहे, जेणेकरून आपले डॉक्टर या आजाराचे  निदान करण्याकरिता त्याचे सखोल विश्लेषण आणि मूल्यमापण करतील. वेळेत हस्तक्षेप केल्यास आपण बाळाला चांगल्या प्रकारे उपचार करू शकू. या आजाराला ठोस असा काही उपचार जरी नसला, तरी बाळाचा सर्वांगीण विकास, विशेषतः बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकास करून घेण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू शकतो.
या आजाराच्या उपचारासाठी टीम वर्क लागते. बालरोग तज्ञ, मेंदूरोग तज्ञ, शक्य असल्यास बाल मेंदूरोग तज्ञ, मानस मेंदूरोग तज्ञ, फिजिओथेरेपिस्ट, स्पीच थेरेपिस्ट, ऑक्युपेशनल थेरेपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, सायको-थेरेपिस्ट, स्पेशालिस्ट शिक्षक/शिक्षिका यांच्यासोबत पालकांनीही यात मदत करणे आवश्यक असते. मुलांना समजून घ्यावे, त्यांची मानसिक आणि बौद्धिक स्थिती समजावी.
तो इतर सर्वसामान्य मुलांसारखा नसून त्याला “स्पेशली चॅलेंज्ड चाईल्ड” म्हणून वागवावे, हे लक्षात ठेवले पाहिजे. बाळाबद्दल वाईट वाटून घेऊन, कीव न करता, त्याला प्रेम दिले पाहिजे, त्याला सहानुभीतीपूर्वक वागवावे, हृदयात दया आणि करुणा असावी. यासाठी प्रचंड धीर आणि संयम असावा लागतो. उपचारात सामील सर्व टीम सदस्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधून वेळोवेळी प्रगतीचा आढावा घ्यावा, एकमेकांना फीडबॅक आणि इंपुट्स द्यावे. बाळाच्या हितासाठी टीमच्या इतर सदस्यांना आपले मत सांगावे, सल्ला द्यावा. ऑटिजम (स्वमग्नता) इतर विकारांपेक्षा वेगळा आहे.
मेंदूच्या इतर विकारांत गल्लत होऊ नये, यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन, उपचार आणि वेळोवेळी भेट देऊन आढावा घेणे खूप महत्वाचे आहे. ऑटिजम केवळ मेंदूचा विकार नाही, की केवळ मानसिक विकार नाही. या विकारात भावनिक आणि सामाजिक विकासावर प्रभाव असल्याने अशा रुग्णांना खूप नाजूकपणे हाताळावे लागते. काय माहित, तुमच्या आसपासही एखादे ऑटिजमचे बाळ असू शकते. त्याला तुमच्या मदतीची आणि योगदानाची गरज असेल.
किमान या दिवशी या विकाराबद्दल जागृती होण्याकरिता तुम्ही ही माहिती सर्वांना पाठवूच शकतात. यासाठी आपल्याला पैसे नव्हे तर, हा मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी थोडासा वेळ, थोडेसे श्रम घ्यावे लागतील. तुमच्या या छोट्याशा कृतीने एक बाळ हसू शकेल, त्याच्या आईला आई म्हणू शकेल, तिला ओळखू शकेल, तिच्याशी खेळू शकेल. एका कुटुंबाला आंनद देण्याचे देवाचे कार्य तर तुम्ही नक्कीच करू शकता… बरोबर ना…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *