डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार
निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि ३० रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या दरम्यान डम्पर हायवाने हिट अँड रन अपघात झाला असून हायवाने एकाचवेळी दुचाकीसह ११ वर्षीय शाळकरी मुलगीला धडक दिली. झालेल्या अपघातात सिद्धी मंगेश लुंगसे (१२) ही जागीच ठार झाली आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागापूर ग्रामस्थांनी नाशिक – छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग तब्बल दीड तास रोखून धरला होता.
मिळालेल्या माहितीनुसार नागापूर (चांदोरी) येथील सिद्धी मंगेश लुंगशे ही सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता शाळेत जात असताना नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नागापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभी असताना तिला नाशिक बाजू कडून चांदोरी कडे जाणारा हायवा डंपर क्रमांक एम एच १५ एच एच ७५७८ ने भरधाव वेगातील हायवा डंपरने जोराची धडक दिली. या अपघातात सिद्धी हायवा डंपर च्या मागील चाकात सापडल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर तिच्यासोबत असलेली तिची शाळकरी मैत्रीण अनुष्का जमधडे ही जखमी झाली. याच दरम्यान या हायवाने डाव्या बाजूने दुचाकी वरून जात असलेले चांदोरी येथील विश्वनाथ जाधव या पती-पत्नीला धडक देत त्यांनाही अपघातात गंभीर जखमी केले आहे. हायवा डंपर नाशिक कडून चांदोरी कडे जात होता, एकाच वेळेस दोन डंपर हे समांतर जात होते तर एका मागे एक डंपर होता. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर नागापूर आणि चांदोरी येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते घटनास्थळी संतप्त नागरिकांनी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित हायवा वरील वाहनचालकावर कठोर कारवाई व्हावी, नागापूर फाटा येथे गतिरोधक बसवून या मार्गे तसेच गोदाकाठ भागात नियमित धावणाऱ्या हायवा डंपरच्या वेगावर नियंत्रण आणावे, नागापूर फाटा येथे स्पिड ब्रेकर बसवावेत अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली. पुष्कर हिंगणे, संदीप गडाख,संदीप टर्ले, बंडू खालकर, राहुल इंगोले, शिवाजी टर्ले व नागापूर येथील नागरिकांनी छत्रपती संभाजी अगर ते नाशिक राज्य मार्ग तब्बल अडीच तास रोखून धरला. घटनास्थळी सायखेडा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक ढोकरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोषींवर कारवाई करून या ठिकाणी उपाययोजना करू असे आश्वासन दिले, निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी यावेळी अपघात स्थळाला भेट दिली.